राज्य शासनाकडून मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत – मुख्यमंत्र्यांनी रूग्णालयात जाऊन केली विचारपूस

खारघर येथे झालेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यासाठी उपस्थित काही श्री सदस्यांना उष्माघातामुळे रुग्णालयात हलवावे लागले. दुर्दैवाने त्यातील अकरा जणांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. मी या श्री सदस्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. ही अतिशय वेदनादायी आणि दुर्दैवी घटना आहे. राज्य शासनातर्फे मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत देण्यात येणार असून रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या श्री सदस्यांचा उपचाराचा खर्च शासनामार्फत केला जाईल असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या श्री सदस्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे रात्री आठच्या सुमारास आले होते. मुख्यमंत्र्यांनी उपचार घेत असलेल्या रुग्णांशी संवाद साधला. त्याचबरोबर तेथील डॉक्टर्ससोबत चर्चा करून उपचाराबाबत माहिती घेतली. एमजीएम रुग्णालयात दाखल असलेले रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांच्या समन्वयासाठी पनवेल महापालिकेचा उपायुक्त दर्जाचा अधिकारी नियुक्त करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. रुग्ण आणि नातेवाईकांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.
यामध्ये 8 महिला आणि तीन पुरुष असे एकूण 11 श्रीसदस्य मृत्यमुखी पडले असून 20 व्यक्तींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर आवश्यक ते उपचार करण्यात येत आहेत. आतापर्यंत एकूण 24 व्यक्तींना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. श्रीमती वायचळ, तुकाराम वांगडे, महेश गायकर, मंजुषा भाबंडे, स्वप्नील केणे, संगीता पवार, जयश्री पाटील आणि भीमा साळवी यांचा मृत्यू झाला.तर 3 मृतांची ओळख पटविण्याचे काम सुरु आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading