राज्याचे २०वे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांची निवड

राज्याचे २०वे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांची निवड झाली आहे. ठाण्यातील नेत्याला मुख्यमंत्रीपद मिळणं हे इतिहासात प्रथमच झालं आहे. मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे यांची झालेली निवड ही राज्यातील राजकारणातला सर्वात मोठा धक्का आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे यांनी काही आमदारांना घेऊन माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना मोठा झटका दिला होता. त्यानंतर शिंदे यांची मुख्यमंत्री पदी झालेली नियुक्ती हा राज्याला मिळालेला मोठा धक्का मानला जातो. गेले काही दिवस सुरू असलेल्या राजकीय घडामोडींमध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील अशी चर्चा होती. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत सर्वच जण फडणवीस मुख्यमंत्री तर एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री होतील अशा कल्पनेत होते. मात्र राज्यपालांना भेटल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांनीच एकनाथ शिंदे यांची राज्याचे मुख्यमंत्री म्हणून घोषणा करून संपूर्ण राज्याला मोठा धक्का दिला आहे. गेले काही दिवस प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे सत्तेसाठी देवेंद्र फडणवीस लोभी असल्याचं चित्र उभं केलं जात होतं. गेल्या काही दिवसांच्या राजकीय घडामोडीत देवेंद्र फडणवीस यांनी कोणत्याही टीकेला उत्तर दिलं नव्हतं तसंच कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केली नव्हती. आज राजभवनात झालेल्या पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्री पदासाठी घोषणा करून देवेंद्र फडणवीस यांनी मोठा आदर्श निर्माण केला आहे. एकनाथ शिंदे यांनीही मुख्यमंत्री म्हणून बोलताना देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक केलं. स्वत:कडे १०५ आमदार असतानाही बाळासाहेबांच्या शिवसैनिकाला फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदासाठी पाठिंबा दिल्याबद्दल एकनाथ शिंदे यांनी त्यांचे आभार मानले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading