येत्या बुधवारी होणारे खग्रास चंद्रग्रहण आपल्या इथे दिसणार नाही – दा. कृ. सोमण

वैशाख पौर्णिमेच्या दिवशी म्हणजे येत्या बुधवारी होणारे या वर्षातील पहिले खग्रास चंद्रग्रहण आपल्या इथून दिसणार नाही अशी माहिती खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी दिली. मात्र या पौर्णिमेच्या दिवशी चंद्र पृथ्वीच्या जवळ येणार असल्याने सुपरमूनचे दर्शन संपूर्ण भारतातून होणार असल्याचंही सोमण यांनी सांगितले. हे चंद्रग्रहण अतिपूर्व ईशान्य भारतातून ओरिसातील पुरी, भुवनेश्वर,कटक,कोलकत्ता, आसाम, मिझोराम , मेघालय, नागालॅंड, अरुणाचल, मणिपूर आणि अंदमान निकोबार बेटे येथून दिसणार आहे. आपल्या इथे त्यावेळी चंद्र दृश्य आकाशात नसल्याने आपल्या इथून हे चंद्रग्रहण दिसणार नाही. बुधवारी २६ मे रोजी या वर्षातील अखेरच्या सुपरमूनचे दर्शन मात्र आपल्याला साध्या डोळ्यानी घेता येणार आहे. चंद्र हा पृथ्वीपासून सरासरी ३ लक्ष ८४ हजार किलोमीटर अंतरावर आहे. पौर्णिमेच्या दिवशी जर चंद्र पृथ्वीच्याजवळ आला तर चंद्रबिंब १४ टक्के मोठे आणि ३० टक्के जास्त तेजस्वी दिसते. यावेळी वैशाख पौर्णिमेच्या दिवशी चंद्र पृथ्वीच्या जवळ ३ लक्ष ५७ हजार ३१० किलोमीटर अंतरावर येणार आहे . त्यामुळे तो मोठा आणि जास्त तेजस्वी दिसणार आहे. बुधवारी संध्याकाळी ७ वाजून १४ मिनिटांनी सुपरमून पूर्वेला उगवेल. रात्रभर आकाशात सुंदर, मनोहारी दर्शन देऊन उत्तररात्री ६ वाजून ३६ मिनिटांनी मावळेल. यानंतर पुढच्यावर्षी सन २०२२ मध्ये १४ जून आणि १३ जुलै रोजी सुपरमून स्थिती होणार आहे. २०२३ मध्ये सुपरमून दिसणार नाही. २०२४ मध्ये १८ सप्टेंबर आणि १० आक्टोबर, २०२५ मध्ये ५ नोव्हेंबर आणि ४ डिसेंबर तर २०२६ मध्ये २४ डिसेंबर रोजी सुपरमून दर्शन होणार असल्याचे दा. कृ. सोमण यांनी सांगितले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading