यंदाची दिवाळी ध्वनिप्रदूषण विरहित, फटाकेमुक्त, तेजोमय साजरी करण्याचे महापौर-महापालिका आयुक्तांचे आवाहन

पारंपारिक सण उत्सव साजरी करण्याची महाराष्ट्राची संस्कृती अबाधित ठेवून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाची दिवाळी ध्वनिप्रदूषण विरहित, फटाकेमुक्त, पर्यावरणपूरक आणि अधिक तेजोमय पद्धतीने साजरी करण्याचे आवाहन महापौर नरेश म्हस्के आणि महापालिका आयुक्त विपिन शर्मा यांनी ठाणेकरांना केले आहे. दरम्यान संपूर्ण ठाणे शहरात स्वच्छता अभियान व्यापक प्रमाणात राबविण्यात येत असून ठाणे शहर स्वच्छ, सुंदर ठेवण्याची नैतिक जबाबदारी आपल्या सर्वांचीच असल्याचे महापौर आणि महापालिका आयुक्त यांनी स्पष्ट केले आहे. महाराष्ट्राला सण उत्सवाची मोठी सांस्कृतिक परंपंरा आहे. हे सर्व सण पर्यावरणाशी निगडित असून ते संपूर्ण राज्यात मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात. वर्षभरातील सणांपैकी दिवाळी हा सर्वात मोठा आणि आनंदाचा सण असून लहान मुलांपासून ते वयोवृद्ध या सणात मोठ्या उत्साहाने सहभागी होवून आनंद लुटत असतात. तथापि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने फटाके न वाजविता ही दिवाळी साजरी करण्याचे आवाहन केले आहे. दिवाळी हा प्रकाशाचा, दाही दिशा तेजोमय प्रकाशाने उजळण्याचा सण यंदा कोरोनाच्या जागतिक महामारीत सापडला आहे. आपण सर्वजण या महामारीचा यशस्वी सामना करीत असलो तरीही दिवाळी साजरी करताना सर्वांची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. सण-उत्सव साजरे करताना प्रशासनाने घातलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे. फटाके वाजवल्याने हवा आणि वातावरण दूषित होते. मोठ्या आवाजाच्या फटाक्यांमुळे श्रवणशक्तीवर परिणाम होते. फटाकेनिर्मितीत वापरलेल्या रसायनांमुळे श्वसनाचे अनेक गंभीर आजार उदभवतात. कोरोना झालेल्या रुग्णांना तसेच बरे झालेल्या व्यक्तींना देखील दिवाळीत होणाऱ्या हवा प्रदूषणाचा त्रास मोठ्या प्रमाणात होवू शकतो. त्यामुळे यंदाची दिवाळी ध्वनिप्रदूषण विरहित, फटाकेमुक्त तसेच पर्यावरण पूरक साजरी करून यंदाची दिवाळीची तेजोमय साजरी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शहरात प्लास्टिक बंदी तसेच ”स्वच्छ सर्वेक्षण २०२१” या मोहिमा सुरु झाल्या आहेत. प्लास्टिक वापरणाऱ्या तसेच रस्त्यावर कचरा टाकणाऱ्यांना विरुद्ध महापालिकेच्यावतीने कडक कारवाई करण्यात येत आहे. स्वच्छता मोहिमेअंतर्गत स्वच्छता तसेच प्लस्टिक बंदीबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी सर्व प्रभाग समितीस्तरावर विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. तसेच महापालिकेच्या सर्व प्रभागसमिती स्तरावर प्लास्टिक वापरणाऱ्या आस्थापनावर कडक कारवाई करण्याचे काम सुरु आहे. ठाणे शहरात स्वच्छता अभियान व्यापक प्रमाणात राबविण्यात येत असून नागरिकांनी दिवाळी या सणाचे पावित्र्य राखत सामाजिक भान ठेवून ध्वनिप्रदूषण विरहित, फटाकेमुक्त तसेच पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याचे आवाहन महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading