मृत कचरावेचक सुनीता कांबळेच्या वारसांना नुकसान भरपाई आणि योग्य पुनर्वसन करण्याची ठाण्यातील जन आंदोलनांची मागणी

मेट्रोची लोखंडी प्लेट अंगावर पडून जागीच मृत झालेल्या कचरावेचक सुनीता कांबळे च्या वारसांना नुकसान भरपाई द्या आणि वारसांचे योग्य पुनर्वसन करा, अशी मागणी ठाण्यातील श्रमिक जनता संघ, जन आंदोलनांचा राष्ट्रीय समन्वय आणि म्युज फाऊंडेशन तर्फे ठाणे जिल्हाधिकारी आणि एम.एम.आर.डी.ए कडे करण्यात आली आहे. विवियाना मॉल जवळील द्रूतगती मार्गावर मेट्रो ४ च्या कामाच्या ठिकाणी लोखंडी प्लेट अंगावर पडल्याने ३७ वर्षीय सुनीता कांबळे या महिलेचा जागीच मृत्यू झाला. मेट्रो सारख्या मोठ्या उपक्रमाच्या ठिकाणी असुरक्षित परिस्थितीमुळे एका महिलेला जीव गमवावा लागला असून ही बाब अतिशय निंदनिय आहे. मेट्रोचे काम असुरक्षित स्थितीत असल्याचेच यावरून स्पष्ट होत आहे. कोणत्याही सार्वजनिक उपक्रम राबवतांना सार्वजनिक सुरक्षेची जबाबदारी ही उपक्रम पूर्ण करण्यासाठी जबाबदारी घेतलेल्या कंत्राटदार कंपनीची आहे. कंपनीच्या दुर्लक्षामुळे कचरावेचक मागासवर्गीय महिलेला जीव गमवावा लागला आहे. या महिलेच्या मागे दोन मुली अनाथ झाल्या आहेत. या प्रकरणी तातडीने मृत सुनीता कांबळे यांना न्याय मिळवून देण्यासाठी दोषीं विरोधात मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा. तसेच निष्काळजीपणा करणा-या कंपनी कडून मृताच्या वारसांना नुकसान भरपाई द्यावी आणि त्याच्या दोन्ही मुलींचे शिक्षण, निवास, सन्मानजनक जीवननिर्वाहाची नैतिक जबाबदारी शासनाने उचलावी अशी मागणी या पत्राद्वारे करण्यात आली आहे.
सार्वजनिक ठिकाणी सुरू असलेल्या उपक्रमा मध्ये लोकांच्या जीवाला कोणता ही धोका निर्माण होणार नाही ह्याची उपाययोजना करण्यासाठी संबंधितांना योग्य समज द्यावी. अशी मागणी श्रमिक जनता संघाचे सरचिटणीस जगदीश खैरालिया, जन आंदोलनांचा राष्ट्रीय समन्वयाचे राष्ट्रीय समन्वयक डॉ संजय मंगला गोपाळ, समता विचार प्रसारक संस्थेचे अजय भोसले,
म्युज फाऊंडेशनचे मोहित मुर्लीधरन, नेहाली जैन, आणि सर्वेश अकोलकर यांनी केली आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading