‘मुख्यमंत्री मातृत्व सुरक्षा’ योजने अंतर्गत महापालिका आणि आयआयटी-मुंबई सामंजस्य करार

महानगरपालिकेच्या ‘मुख्यमंत्री मातृत्व सुरक्षा’ योजने अंतर्गत महापालिका आणि आयआयटी-मुंबई संयुक्तपणे नवजात बालकांच्या सुदृढ आणि सुयोग्य वाढीसाठी उपक्रम सुरू करणार आहे. त्याचा सामंजस्य करार लवकरच केला जाणार असून महापालिका क्षेत्रात या उपक्रमाची अमलबजावणी केली जाईल, अशी माहिती महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिली. या उपक्रमात बाळाच्या जन्मापासून ते १० महिन्यापर्यंत बाळाचे पोषण आणि मातेची काळजी याकडे विशेष लक्ष दिले जाईल. या सोबतच बाळाला स्तनपान देण्याची विशिष्ट पद्धत यावर भर दिला जाणार आहे. आयआयटी-मुंबई सोबत कार्यरत असलेल्या ‘सेंटर फॉर टेक्नॉलॉजी अल्टरनेटिव फॉर रुरल एरिया’च्या डॉ. रुपल दलाल यांची ही संकल्पना असून राज्यातील इतर काही जिल्ह्यात त्याची अंमलबजावणी करण्यात आली आहे. बाळाच्या जन्मापासून सहा महिने बाळाला इतर कोणताही आहार ना देता फक्त आईचे दूध देणे हे बाळाच्या वाढीसाठी अत्यंत आवश्यक आहे. मात्र, केवळ स्तनपान देवून बाळाच्या सर्वांगीण वाढीचे अपेक्षित उद्दिष्ट साध्य होत नाही. स्तनपान जर योग्य पद्धतीने झाले तरच ते आई आणि बाळाच्या दृष्टीने उपयोगी ठरते. तसेच, बाळाला आईच्या दुधाचा संपूर्ण क्षमतेने लाभ होऊन बाळाचा सर्वांगीण विकास होण्यास हातभार लागतो. जर गरोदर मातांना हे प्रशिक्षण बाळाच्या जन्मापूर्वी दिले तर मातांना त्याचा वापर करणे शक्य होईल.
या उपक्रमासाठी ठाण्यातील अंगणवाडी सेविका आणि आशा सेविका यांच्यातून ५० मास्टर ट्रेनर निवडले जातील. त्यांना आयआयटी मुंबईच्या तज्ज्ञ टीम मार्फत प्रशिक्षण दिले जाईल. या मास्टर ट्रेनर इतर सर्व अंगणवाडी सेविका आणि आशा सेविका यांना प्रशिक्षण देतील असेही आयुक्त बांगर यांनी स्पष्ट केले.
हा कार्यक्रम कालबद्ध पद्धतीने राबविण्यासाठी आरोग्य यंत्रणेतील सर्वात महत्त्वाचा दुवा हा आशा आणि अंगणवाडी सेविका यांचा आहे. हा उपक्कम संस्थात्मकदृष्या आरोग्य विभागाकडून स्वीकारला जाईल आणि भविष्यातही त्याची अमलबजावणी होईल हे सुनिश्चित केले जाईल, असे आयुक्त बांगर यांनी नमूद केले.

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading