मुंब्र्यातील काळसेकर रुग्णालय आता कोवीड १९ पॉझिटिव्ह सिमटोमॅटिक रुग्णालय म्हणून घोषित

मुंब्र्यातील काळसेकर रुग्णालय कोवीड १९ पॉझिटिव्ह सिमटोमॅटिक रुग्णालय म्हणून घोषित करण्यात आलं आहे. ठाणे महापालिका क्षेत्रात कोव्हीड 19 चा वाढता संसर्ग लक्षात घेवून बाधित रुग्णांना उत्तम प्रकारच्या वैद्यकीय सोयी उपलब्ध होण्यासाठी तसेच जे रुग्ण स्वतः खर्च करून उपचार घेवू शकतात त्यांच्यासाठी आता मुंब्र्यातील काळसेकर रुग्णालय हे कोवीड १९ पॉझिटिव्ह सिमटोमॅटिक रुग्णालय म्हणून घोषित करण्याचा महत्वपूर्ण निर्णय आज पालिका आयुक्त विजय सिंघल यांनी घेतला. कोव्हीड 19ची लागण बऱ्याच नागरिकांना झाल्याचे वेळोवळी निदर्शनास येत असल्याने बाधित नागरिकांना तातडीने आयसोलेट करणे, उपचारासाठी रुग्णालयामध्ये स्वतंत्र विभागात दाखल करणे, रुग्णाच्या सर्व तपासण्या करणे आदी कारणासाठी कोव्हीड रुग्णालय म्हणून घोषीत करणे आवश्यक आहे. त्या पार्श्वभूमीवर ७० ते ८० रुग्ण या रुग्णालयात दाखल करुन सोशल डिस्टसिंग ठेवून उपचार करणे शक्य आहे. पालिका क्षेत्रात कोव्हीड रुग्णांवर उपचार करण्यासाठी सध्या जिल्हा सामान्य रुग्णालय, होरॉयझन, कौशल्या आणि वेदांत रुग्णालय कोव्हीड १९ रूग्णालये म्हणून यापूर्वीच घोषित करण्यात आली आहेत. या व्यतिरिक्त बेथनी रुग्णालय कोरोना संशयित रुग्ण दाखल करणे आणि उपचार करणे यासाठी घोषित करण्यात आले आहे. परंतु वाढता संसर्ग टाळण्यासाठी तसेच बाधित रुग्णांना तात्काळ उपचार देता यावेत यासाठी आता रुग्णालयामधील कार्यरत वैद्यकिय तज्ञ, परिचारीका, प्रसविका, पॅरामेडीकल स्टाफ, सफाई कर्मचारी, सर्व रुग्णांच्या उपचारासाठी लागणारे वैद्यकिय पथक, रुग्णांना आवश्यक असणाऱ्या इतर सर्व सुविधा, अति दक्षता विभाग, व्हेंटिलेटर आदी सर्व सुविधांसह काळसेकर रुग्णालय कोवीड १९ पॉझिटिव्ह सिमटोमॅटिक रुग्णालय म्हणून घोषित करण्यात आले आहे. यापुढे या रुग्णालयामध्ये फक्त कोव्हीड बाधित रूग्ण उपचारासाठी दाखल करण्यात येणार असून अशा रुग्णांवर उपचार करणे हॉस्पिटल प्रशासनावर बंधनकारक राहणार आहे. कोणत्याही परिस्थितीत कोवीड आणि नॉन – कोवीड रुग्णांचे मिक्सिग करण्यात येऊ नये. तसेच संशयित आणि कोवीड कन्फर्म पॉझिटिव्ह रुग्णांचे सुध्दा मिक्सिंग करण्यात येऊ नये असे आदेश महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी दिले आहेत.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading