ठाणे जिल्हा रेड झोनमधुन बाहेर पडण्याची चिन्हे धूसर – जिल्ह्यातील बाधितांचा आकडा ८६० वर

ठाणे जिल्हा रेड झोनमधुन बाहेर पडण्याची चिन्हे धूसर होत असून दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढच होत आहे. काल दिवसभरात 58 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाल्याने आता आकडा 860 वर पोहचला आहे तर जिल्हयातील मृतांची एकुण संख्या 22 आहे. ठाणे शहरातील वागळे आणि कोपरी पूर्णतः सील करून देखील वागळेत कोरोनाचा कहर सुरूच आहे. वागळे इस्टेट, सी पी तलाव भागात काल 10 रुग्ण सापडले तर कोपरीत मात्र एकही रुग्णाची नोंद झालेली नाही. तर मुंब्र्यातील आकडा पन्नाशीत गेला आहे. ठाणे महापालिका हद्दीत एकाच दिवशी 23 नवीन रुग्णांची नोंद झाल्याने ठाण्यातील कोरोनाबाधीतांची संख्या 279 वर पोहोचली आहे. यात वागळे इस्टेटमध्ये सर्वाधिक 10, कळवा प्रभागात 5, उथळसर 2, माजिवडा, वर्तकनगर, लोकमान्यनगर प्रभागात प्रत्येकी 1 आणि मुंब्रा प्रभागात 3 रुग्ण सापडले. कल्याण डोंबिवलीत 13 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली असून रुग्णांची संख्या 156 वर गेली आहे. नवी मुंबई महापालिका क्षेत्रात 18 रुग्ण आढळल्याने आकडा 206 वर पोहोचला आहे. बदलापूरमध्ये तीन रुग्ण आढळल्याने एकुण रुग्णसंख्या 25 झाली आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading