मुंब्रा बाह्यवळण मार्ग, साकेत आणि खारेगाव पुलाच्या दुरुस्ती काळात पर्यायी मार्गाचे सुयोग्य नियोजन करा – जिल्हाधिकारी

मुंब्रा बाह्यवळण मार्गाच्या रस्त्याची दुरुस्ती करण्याचे काम येत्या एक एप्रिलपासून सुरू होणार आहे. तसेच साकेत – खारेगाव खाडीपुलावरील रस्त्याच्या दुरुस्तीचे कामही पुढील महिन्यात करण्यात येणार आहे. या काळात ठाणे शहर आणि परिसरातील वाहतूक सुरळीत राहण्यासाठी संबंधित पोलीस यंत्रणांनी सुयोग्य नियोजन करावे. तसेच इतर सर्व यंत्रणांनी वाहतूक कोंडी होणार नाही, यासाठी सतर्क रहावे. या मार्गावरील वाहतूक वळविण्यात येणाऱ्या पर्यायी मार्गांवरील रस्ते आणि पुलांची स्थिती सुव्यवस्थित राहतील याची काळजी संबंधित यंत्रणांनी घ्यावे, असे निर्देश जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी दिले.

मुंब्रा कौसा बाह्यवळण रस्त्यावरील रेल्वे उड्डाणपूलावर कायमस्वरुपी उपाय योजना करण्यासाठी अल्ट्रा हाय परफॉर्मन्स तंत्राने काँक्रिटीकरणाचे काम सुरू करण्यात येणार आहे. तसेच साकेत उड्डाणपूल आणि खारेगाव खाडी पुलावरील रस्त्याची दुरुस्ती करण्यात येणार आहे. या मार्गांवरील दुरुस्ती काळातील वाहतूक नियोजनसंदर्भात जिल्हाधिका-यांनी आढावा घेऊन सूचना केल्या.

ठाणे शहर आणि परिसरातील वाहतूक कोंडी दूर करण्यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उच्चस्तरीय आढावा बैठक घेतली होती. याबैठकीत मुंब्रा बाह्यवळण मार्ग, तसेच साकेत आणि खारेगाव खाडी पुलावरील रस्त्याची दुरुस्ती गरजेची असून ती तातडीने सुरू करण्याचे निर्देश दिले होते. राष्ट्रीय महामार्ग, मेट्रो, एमएसआरडीसी, एमएमआरडीए, सार्वजनिक बांधकाम, वाहतुक पोलिस, महापालिका बांधकाम विभाग या विभागांच्या अधिकाऱ्यांनी समन्वयातून ही कामे करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या होत्या.  त्याअनुषंगाने जिल्हाधिका-यांनी संबंधित यंत्रणांसोबत दुरुस्ती करण्यात येणाऱ्या रस्त्यांची तसेच या कामामुळे वळविण्यात येणाऱ्या पर्यायी वाहतूक मार्गांची पाहणी केली. त्यानंतर दुरुस्तीचे काम, पर्यायी मार्गांसंदर्भात जिल्हाधिका-यांनी सर्व यंत्रणांची एकत्रित बैठक घेऊन यंत्रणांना सूचना दिल्या.

मुंब्रा बाह्यवळण मार्गाची दुरुस्ती करणे गरजेचे आहे. या दुरुस्ती कामासाठी किमान दोन महिन्यांचा कालावधी लागणार आहे. या काळात ठाणे शहरात येणारी वाहतूक तसेच जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टकडे (जेएनपीटी) जाणारी, तेथून गुजरात, नाशिककडे जाणारी वाहतूक विशेषतः अवजड वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्याचे नियोजन ठाणे शहर पोलीस, महामार्ग पोलीस तसेच नवी मुंबई पोलीस यांनी केले आहे. या काळात पर्यायी मार्गावर वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी सर्व यंत्रणांनी काळजी घ्यावी. तसेच वाहतुकीतील बदलांची माहिती वाहनाचालकांपर्यंत पोहचेल याची दक्षता घ्यावी.

            साकेत उड्डाणपूल आणि खारेगाव खाडीपुलाचे काम 10 एप्रिलपासून सुरू होणार आहे. या दोनही मार्गावरील दुरुस्ती काळात वाहतूक नियोजनासाठी लागणारे मनुष्यबळ, साहित्य सार्वजनिक बांधकाम विभागाद्वारे देण्यात येणार आहे. जेएनपीटीकडून गुजरात, नाशिकच्या दिशेने व गुजरात, नाशिककडून जेएनपीटीकडे जाणारी अवजड वाहनांची वाहतुकीचे योग्य नियोजन करावे. गर्दीच्या वेळेस ही वाहने काही काळ थांबवून ठेवण्यासाठी पर्यायी मार्गावर ठाणे शहराच्या आजूबाजूच्या परिसरात संबंधित यंत्रणांनी जागा उपलब्ध करून द्यावी. जेणेकरून गर्दीच्या काळात ही वाहने रस्त्यावर येणार नाहीत. तसेच पार्किंगच्या जागांच्या ठिकाणी सुविधाही निर्माण करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading