मातृत्वाचा सन्मान हाच आमचा अभिमान – मुख्यमंत्री

घरातील एक माता सशक्त असेल तर संपूर्ण घर सुरक्षित असते. त्यामुळे महिलांचे आरोग्य हे सशक्त असणे गरजेचे आहे, मातृत्वाचा सन्मान हाच आमचा अभिमान आहे असे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नमूद करीत महिला पोलीस कर्मचाऱ्यांच्या हस्ते टेंभीनाका येथे आयोजित केलेल्या माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियानाचे उद्घाटन केले. ठाणे महापालिका क्षेत्रात २६ सप्टेंबर ते ०५ ऑक्टोबर दरम्यान ‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित ’ अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानातील एक उपक्रम म्हणून ठाणे महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे टेंभी नाका येथील नवरात्रोत्सवात महिलांसाठी विशेष आरोग्य शिबीर दहा दिवस राबविण्यात येत आहे. टेंभी नाका नवरात्रोत्सवात हजारो महिला देवीच्या दर्शनासाठी येतात. त्यांना आरोग्य तपासणीचा लाभ मिळावा यासाठी ठाणे महापालिकेच्या आरोगय विभागाच्यावतीने हे शिबिर आयोजित केले आहे. देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या सर्व महिला भाविकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, यासाठी देवी मंडपात जनजागृती करण्यात येणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. या अभियानाचे उद्घाटन महिला पोलीसांच्या हस्ते केले, कारण महिला पोलीस या संपूर्ण समाजाचे रक्षण करीत असून समाजाबरोबर घर सुरक्षित ठेवण्याचे कामही त्या करीत आहे, हे अभियान महिलांसाठी असल्यामुळे उद्घाटन महिला पोलीसांच्या हस्ते केले असल्याचे त्यांनी सांगितले. ठाणे महापालिकेने उभारलेल्या या संपूर्ण यंत्रणेचे कौतुक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी केले.

 

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading