माजीवडा जंक्शन आणि कोपरी पोलिस ठाण्यातून राज्य परिवहन महामंडळातर्फे विनामूल्य बस

ठाण्यातील माजीवडा जंक्शन आणि कोपरी पोलिस ठाण्यातून राज्य परिवहन महामंडळातर्फे विनामूल्य बस सोडण्यात आल्या. राज्यातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यात अडकून पडलेल्यांना त्यांच्या मूळ गावी जाण्यासाठी कालपासून राज्य परिवहन महामंडळातर्फे विनामूल्य बस सेवा सुरु करण्यात आल्याची माहिती परिवहन मंत्र्यांनी दिल्यानंतर आज माजीवडा येथून ४ गाड्या मजुरांना घेऊन निघाल्या आहेत. या मजुरांना ही गाडी मध्यप्रदेशच्या सीमेपर्यंत सोडणार आहे. तर कोपरी पोलीस ठाण्यातून सुटलेली बस धुळे जिल्ह्यातील शिरपूर डेपोपर्यंत जाणार आहे. रस्त्यावरून पायपीट करणा-या ५० ते ६० जणांना ताब्यात घेऊन कोपरी पोलीसांनी त्यांची जाण्याची सोय केली. लॉकडाउनमुळे विविध जिल्ह्यांमध्ये अडकलेले लोक, विद्यार्थी, मजूर या सगळ्यांसाठी ही सेवा असणार आहे. प्रतिबंधित क्षेत्रातल्या लोकांना हा प्रवास करता येणार नसून रेड झोनमधल्या लोकांना कोरोना चाचणी करून प्रवास करता येईल असं सांगण्यात आलं. तीन हात नाका येथूनही अशी बससेवा सुरू करण्यात येणार आहे. परिवहन सेवेच्या या बसमध्ये २२ जण प्रवास करणार असून सोशल डिस्टन्सिंगची काळजी घेण्यात येत आहे. ज्या मजुरांना एसटी मधून प्रवास करायचा असेल त्यांनी २२ जणांची यादी करून पोलीस ठाण्यात द्यावी. यामध्ये मोबाइल नंबर, आधारकार्ड, राज्यात कोणत्या ठिकाणी जायचं आहे याची माहिती लिहून पाठवावी असं आवाहन करण्यात आलं आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading