परराज्यातील मजूर नाकाबंदी चुकवण्यासाठी चक्क नाल्यातुन पायपीट करत जीवघेणा प्रवास करत असल्याचं चित्रण व्हायरल

परराज्यातील मजूर नाकाबंदी चुकवण्यासाठी चक्क नाल्यातुन पायपीट करत जीवघेणा प्रवास करत असल्याचं चित्रण व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. मुळगावी जाण्याची ओढ लागलेल्या परराज्यातील मजुरांनी पोलिसांची नाकाबंदी चुकवण्यासाठी चक्क नाल्यातुन पायपीट करीत गावचा रस्ता धरला आहे. ठाण्यातील आनंदनगर टोलनाक्यावरून पुढे पोलीस अडवत असल्याने मध्यरात्रीच्या सुमारास पूर्वद्रूतगती महामार्गालगत असलेल्या नाल्यातुन शेकडो मजूर कुटुंब काबिल्यासह जीवघेणा प्रवास करीत असल्याचे चित्रण व्हायरल झालं आहे. दरम्यान कोपरी पोलिसांनी मात्र आनंदनगर येथील नाला खोल असुन उत्तुंग संरक्षक भिंती पार करणे अशक्य असल्याचे स्पष्ट केले आहे. पोलिसांनी पूर्वद्रुतगती मार्गावर नाकाबंदी सुरु केली असल्याने मजुरांची अडचण झाली असून मजुरांना पोलीस माघारी पिटाळत असल्याने हे मजुर रात्रीच्या अंधारात चक्क नाल्यातुन मार्गक्रमण करीत आहेत. यामध्ये लहान मुलं आणि महिलादेखील या नाल्यातून प्रवास करत असुन नाल्यातील घाण पाण्यासह जीवजंतू, साप, विषारी किटाणूंच्या भितीचा कुठलाही लवलेश मनी न बाळगता हे मजूर आता आपला जीव धोक्यात टाकत आहेत. नाल्यातून रस्ता पार करताना काही स्थानिक नागरिकांनी या मजुरांना पाहिले पण त्यांना न हटकता या नागरिकांनी त्यांना पाण्याच्या बाटल्या आणि जेवणाचे डबे दिले असल्याचं सांगण्यात आलं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading