महाराष्ट्र स्टार्टअप, नाविन्यता यात्रेचे १७ ते १९ ऑगस्ट दरम्यान ठाणे जिल्ह्यात आगमन

कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागांअंतर्गत “महाराष्ट्र स्टार्टअप व नाविन्यता यात्रेचे”  आयोजन करण्यात आले आहे.

ही यात्रा दि. १७ ते १९ मे २०२२ या दरम्यान ठाणे जिल्ह्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये येणार असून इच्छुक उमेदवारांनी या यात्रेत सहभागी व्हावे, असे आवाहन ठाणे जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकताच्या मार्गदर्शक सहायक आयुक्त संध्या साळुंखे यांनी केले आहे.

या यात्रेदरम्यान, ठाणे व भिवंडी मध्ये दि.१७ ऑगस्ट २०२२ रोजी, मुरबाड व शहापूरमध्ये दि.१८ ऑगस्ट २०२२ रोजी आणि दि. १९ ऑगस्ट २०२२ रोजी कल्याण, उल्हासनगर व अंबरनाथ या तालुक्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थामध्ये यात्रेचा प्रचार व प्रसार मोबाईल व्हॅनद्वारे करण्यात येणार आहे. यावेळी या यात्रेबाबतची संपूर्ण माहिती, नावीन्यपूर्ण संकल्पना व त्याचे इतर पैलू याबाबत माहिती देण्यात येणार आहे. तसेच इच्छुक उमेदवारांची नोंदणी करण्यात येणार आहे.

महाराष्ट्रातील तळागाळातील नवउद्योजकांचा आणि नाविन्यपूर्ण कल्पनांचा शोध घेऊन त्यांना स्थानिक पातळीवर व्यासपीठ उपलब्ध करुण देणे, नवसंकल्पनांना तसेच सुरुवातीच्या टप्प्यातील नवउद्योजकांना प्रोत्साहन, तज्ञ मार्गदर्शन, निधी आणि आवश्यक पाठबळ पुरविणे तसेच राज्यातील उद्योजकता व नाविन्यपूर्ण परिसंस्था बळकट करणे यासाठी या यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.

या योजनेअंतर्गत राज्यातील नावीन्यपूर्ण कल्पना असणारे सर्व नागरिक या यात्रेत सहभागी होऊ शकतात. यात्रेत सहभाग नोंदविण्यासाठी विद्यार्थी व नवउद्योजक हे तालुकास्तरीय प्रचार प्रसिध्दी अभियानादरम्यान, महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीच्या www.msins.in या संकेतस्थळावर भेट देवून तसेच जिल्हास्तरीय सादरीकरण सत्राच्या ठिकाणी प्रत्यक्ष अर्ज करु शकतात.

जिल्हास्तरीय विजेत्यांना रोख रक्कम स्वरुपात पारितोषिक तसेच राज्यस्तरीय विजेत्यांना रोख रक्कम तसेच इनक्युबेशन सहाय्य, बीज भांडवल/निधी साठी सहाय्य, नाविन्यता परिसंस्थेतील महत्वाच्या संस्था व तज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन सत्रे तसेच सॉफ्टवेअर क्रेडिट्स, क्लाऊड क्रेडिट्स सारखे लाभ पुरविण्यात येणार आहेत, असे श्रीमती साळुंखे यांनी कळविले आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading