महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला जिल्ह्यामध्ये १ जागा – राजू पाटील यांचा कल्याण ग्रामीणमधून विजय

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला ठाणे जिल्ह्यातून पहिला आमदार मिळाला आहे. कल्याण ग्रामीण मतदारसंघातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राजू पाटील विजयी झाले आहेत. अतिशय अटीतटीच्या लढतीत राजू पाटील यांनी शिवसेनेचे माजी महापौर रमेश म्हात्रे यांच्यावर विजय मिळवला. या मतदारसंघात सुरूवातीपासूनच शिवसेनेमध्ये बरीच धुसफूस होती. सुरूवातीला शिवसेनेतून सुभाष भोईर यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र त्यावर म्हात्रे यांनी नाराजी दर्शवल्यानंतर म्हात्रे यांना ही उमेदवार देण्यात आली. त्यामुळं या मतदारसंघात शिवसेनेचे दोन उमेदवार अधिकृतपणे रिंगणात होते. या विरोधात रमेश म्हात्रे यांनी आवाज उठवला होता. सुभाष भोईर यांनीही कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढवणार असा इशारा दिला होता. मात्र अर्ज मागे घेण्याच्या दिवशी सुभाष भोईर यांनी माघार घेऊन रमेश म्हात्रे यांना पाठिंबा दिला. त्यामुळं सुरूवातीपासूनच या मतदारसंघात शिवसेनेला त्रास झाला. अगदी अटीतटीच्या लढतीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या राजू पाटील यांनी शिवसेनेच्या रमेश म्हात्रे यांचा ७ हजार १५४ मतांनी पराभव केला. राजू पाटील यांना ९३ हजार ९२७ मतं तर रमेश म्हात्रे यांना ८६ हजार ७७३ मतं मिळाली. या मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीच्या अमोल केंद्रे यांना ६ हजार १९९ मतं मिळाली तर ६ हजार ९२ मतदारांनी नोटाचा म्हणजे यापैकी कोणीही नाहीचा वापर केला. या दोन्हीचा फटका शिवसेनेच्या रमेश म्हात्रे यांना बसला आणि त्यांचा पराभव झाला आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा एकमेव आमदार विधानसभेवर निवडून येऊ शकला.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading