महापालिकेच्या समाज विकास विभागाच्या योजनांमध्ये पात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना अनुदानाचे वाटप गणेशोत्सवापूर्वी होणार

महापालिकेच्या समाज विकास विभागाच्या योजनांमध्ये पात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना अनुदानाचे वाटप गणेशोत्सवापूर्वी होणार आहे. ठाणे महापालिकेच्या समाज विकास विभागाअंतर्गत महिला आणि बालविकास योजनेच्या माध्यमातून विविध योजना राबविल्या जातात. या योजनांमध्ये 60 वर्षावरील विधवा तसेच घटस्फोटित आर्थिक दुर्बल घटकातील ज्येष्ठ महिलांना अर्थसहाय्य देणे तसेच कोणत्याही कारणामुळे पतीचे किंवा कर्त्या पुरूषाचे निधन होऊन विधवा झालेल्या महिलांच्या पुनर्वसनासाठी अर्थसहाय्य यांचा समावेश आहे. या योजनेसाठी पात्र झालेल्या लाभार्थ्यांना गणेशोत्सवापूर्वी अनुदानाचे वाटप करावे अशी मागणी शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के यांनी महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांचेकडे लेखी निवेदनाद्वारे केली. 60 वर्षावरील विधवा तसेच घटस्फोटित आर्थिक दुर्बल घटकातील ज्येष्ठ महिलांना अर्थसहाय्य देणे या योजनेसाठी एकूण 14952 तर कोणत्याही कारणामुळे पतीचे किंवा कर्त्या पुरूषाचे निधन होऊन विधवा झालेल्या महिलांच्या पुनर्वसनासाठी अर्थसहाय्य या योजनेसाठी 1518 इतके अर्ज प्राप्त झाले आहे. या योजनेतील लाभार्थ्यांना गणेशोत्सवापूर्वी अनुदान देण्याचे आयुक्त बांगर यांनी मान्य केले असल्याचे नरेश म्हस्के यांनी सांगितले. ठाणे महापालिका कार्यक्षेत्रातील गरीब आणि गरजू महिलांना या योजनांचा लाभ मिळणार असून या निर्णयामुळे या योजनेसाठी पात्र असलेल्या लाभार्थ्यांमध्ये देखील आनंदाचे वातावरण पसरले आहे.

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading