महापालिकेच्या लसीकरण महोत्सवात सेनेचे श्रेय – राष्ट्रवादीचा महापौरांना जाब

कळवा-खारीगाव येथे आयोजित केलेल्या महालसीकरण शिबिराचे श्रेय घेण्याच्या नादात महापौर नरेश म्हस्के यांनी लसीकरणासाठी लागणारा दहा लाखांच्या खर्चाचा भार आम्ही उचलला होता अशी टीका केली होती. या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेसने जोरदार उत्तर दिले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे, गटनेते नजीब मुल्ला, विरोधी पक्षनेते शानू पठाण यांनी ठाणे पालिकेत जाऊन महापौरांना 20 लाख रुपयांचा धनादेश देण्याचा प्रयत्न केला. मात्र, महापौरांनी तो स्वीकारला नाही. पालिकेच्या लसीकरण महोत्सवाचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न शिवसेनेकडून केला जात असून बॅनरवरही गृहनिर्माण मंत्र्यांना स्थान दिले जात नसल्याबाबत आनंद परांजपे यांनी संताप व्यक्त केला. नुकतेच आनंद विहार, खारीगाव येथे कोरोना लसीकरण शिबिर आयोजित केले होते. या शिबिराच्या आयोजनात राष्ट्रवादी काँग्रेने महत्वाची भूमिका बजावली होती. यावेळी लसीकरणासाठी आवाहन करणारे फलक राष्ट्रवादीने लावले होते. हे फलकही काही समाजकंटकांनी फाडले होते. तसेच, पालिकेने आयोजित केलेल्या शिबिरात शिवसेना नेत्यांचे छायाचित्र असलेले फलक लावण्यात आले होते. त्यावरुन राष्ट्रवादीने जोरदार टीका केली होती. या टीकेस उत्तर देताना, केवळ लस सरकारने पुरविल्या असून इतर खर्च शिवसेनेने केला असल्याच्या आशयाचे विधान महापौरांनी केले होते. या विधानाचा समाचार घेण्यासाठी आनंद परांजपे यांनी थेट 20 लाखांचा धनादेश देत कोपरी-पाचपाखाडी येथील रोड नंबर 22 येथे आणि ठाणे शहरातील पालिका मुख्यालयासमोर लसीकरण शिबिर आयजित करावे; त्याचा खर्च या 20 लाखांतून करावा असे सुचविले; मात्र महापौरांनी हा धनादेश स्वीकारला नाही. यावेळी या लस महाराष्ट्र शासन पाठवत असल्याचे आनंद परांजपे यांनी सांगितल्यानंतर तुम्ही शासनाकडून लस आणा; आम्ही तुम्हाला ओळखत नाही असे विधान महापौरांनी केल्यामुळे महापौर दालनात प्रचंड गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. कोविडचा लसीकरण महोत्सव आम्हाला कोपरी-पाचपाखाडी आणि ठाणे शहर मतदारसंघात घ्यावयाचा आहे. याचे निवेदन देण्यासाठी आम्ही गेलो होतो. तसेच, शनिवारी महापौरांनी आपल्या निवेदनामध्ये म्हटले होते की, जरी लसीकरण महापालिका करीत असली तरी त्याचा खर्च शिवसेनेचे कार्यकर्ते करतात; त्यामुळे डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या वैयक्तीक खासगी बँक खात्यातील वीस लाखांचा धनादेश आपण महापौरांना द्यायला गेलो होतो. पण, महापौरांचे कसे आहे की, खोटं बोला पण रेटून बोला. खारीगाव येथे शिवसेनेचे एकच नगरसेवक आहेत. तीन नगरसेवक राष्ट्रवादीचे आहेत. कळवा प्रभाग समितीच्या सभापती वर्षा मोरे यांच्या माध्यमातून रोज लसीकरण चालू आहे. पण, लसीकरणात राजकारण करायचे, असे धोरण सत्ताधार्‍यांचे आहे. या भेटीत महापौरांनी लसीकरणाचा खर्च राष्ट्रवादीच्या खिशातून येतो का, असा सवाल केला आहे. त्यावर आपले म्हणणे आहे की, शहरातील विकास कामांचा खर्च हा काही शिवसेना आपल्या बँक खात्यातून देते का? तोही करदात्यांच्या पैशातूनच होत असतो ना? शिवसेना जर अरे करु शकते, तर राष्ट्रवादी त्यास कारे करु शकते असे परांजपे यांनी सांगितले. शनिवारी पहाटे तीन वाजता खारीगाव येथे राष्ट्रवादीचे बॅनर फाडण्यात आले होते. या बॅनर फाडण्यामागे शिवसेनेचे नगरसेवक गणेश कांबळे हेच असल्याचा गौप्यस्फोटही आनंद परांजपे यांनी केला. हे बॅनर गणेश कांबळे यांनीच फाडले असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे. अरविंद मोरे यांनी या संदर्भात कळवा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे. त्यामुळे पालकमंत्र्यांना विनंती आहे की त्यांनी सत्याच्या, न्यायाच्या बाजूने उभे रहावे. पालकमंत्र्यांनी म्हटले होते की, ‘शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या संस्कारातून घडलेले शिवसैनिक बॅनर फाडण्याचे कृत्य करणार नाहीत’. त्यांच्या या विधानाशी आपण सहमत आहोत. आपणालाही माहित आहे की, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या संस्कारात घडलेले शिवसैनिक असे कृत्य करणार नाहीत; पण, उसने आवसान आणून निर्माण झालेल्या शिवसैनिकांनी हे कृत्य केलेले आहे. आगामी निवडणुकीत विद्यमान लोकप्रतिनिधींना त्रास होणार असल्यानेच अशी टीका केली जात असल्याचे श्रीकांत शिंदे यांनी म्हटले होते. त्या विधानाचाही आनंद परांजपे यांनी समाचार घेतला आहे. त्रास कोणाला होणार आहे, याचे भान खासदारांना नाही. ते आम्हाला त्रास देण्यासाठी जातील; पण, त्यांना सबंध लोकसभा मतदारसंघात सन 2024 मध्ये त्रास होईल,याची जाणीव त्यांना अद्यापही झालेली नाही, असेही परांजपे यांनी म्हटले आहे.

 

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading