महापालिकाआयुक्तां कडून विर्सजन घाट आणि कृत्रिम तलावांची पाहणी

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणेशमुर्तीं विसर्जनासाठी ठाणे महानगरपालिकेच्यावतीने तयार करण्यात आलेल्या कृत्रिम तलावांची व विसर्जन घाटांची आज महापालिका आयुक्त डॉ.विपिन शर्मा यांनी पाहणी केली. यावेळी कोरोनाचा संसर्ग लक्षात घेता विशेष खबरदारी घेत यंदाच्या गणेशोत्सवासाठी महापालिका यंत्रणा सज्ज असल्याची माहिती महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी दिली. आज सकाळी महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी कोलशेत विसर्जन महाघाट येथून कृत्रिम तलावांची व विसर्जन घाटांची पाहणी करण्यास सुरुवात केली.

श्री गणेश मुर्तींचे विधिवत वाहत्या पाण्यात विसर्जन व्हावे यादृष्टीकोनातून महापालिकेने पारसिक रेतीबंदर, कोलशेत, कोपरी (चेंदणी कोळीवाडा) कळवा पूल(निसर्ग उद्यान), कळवा(ठाणे बाजू) आणि दिवा घाट येथे एकूण ७ विसर्जन घाट तयार करण्यात आले आहेत. या ठिकाणी छोटया गणेश मुर्तींबरोबर मोठया आकाराच्या गणेश मुर्तींचे विसर्जन करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. श्री गणेश मुर्तींच्या विसर्जनामुळे शहरातील तलावांचे होणारे प्रदूषण रोखण्यासाठी महापालिकेच्यावतीने मासुंदा तलाव, खारेगाव तलाव, न्यू शिवाजी नगर, कळवा तलाव, वागळे इस्टेट परिसरातील रायलादेवी तलाव नं.१, रायलादेवी तलाव नं.२, उपवन येथे पालायदेवी मंदिर, आंबेघोसाळे तलाव, निळकंठ वुडस् उपवन तलाव, बाळकुम रेवाळे आणि कावेसर(हिरानंदानी) कृत्रीम तलाव निर्माण करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे ज्या भाविकांना विसर्जन घाट किंवा कृत्रीम तलावांच्या ठिकाणी श्री मुर्तींचे विसर्जन करता येणे शक्य नाही त्यांच्यासाठी महापालिकेने मासुंदा तलाव, मढवी हाऊस, वर्तकनगरमध्ये देवदया नगर ,शिवाई नगर, चिरंजीवी हॉस्पीटल,महागिरी कोळीवाडा, कोपरी प्रभाग समिती बस स्टॉप, मॉडेला चेक नाका, टेंभी नाका, काशिनाथ घाणेकर नाट्यगृह, पवार बस स्टॉप, वसंत विहार शाळा, कामगार हॉस्पिटल, लोकमान्य नगर बस स्टॉप यशोधन नगर, रिजन्सी हाईट्स, आझादनगर, विजयनगरी, अँनेक्सा कासारवडवली, लोढा लक्झेरिया, जेल तलाव, सह्याद्री शाळा मनीषा नगर आणि दत्त मंदिर, शिळ प्रभाग कार्यालय आदी ठिकाणी श्री गणेश मुर्ती स्वीकार केंद्रे उभारण्यात आली आहेत. महापालिका क्षेत्रातील गणेश मुर्तींचे विसर्जन करण्यासाठी भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी यावर्षीही ९ प्रभाग समितीतंर्गत फिरती विसर्जन व्यवस्था निर्माण करण्यात आली आहे.

दरम्यान कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेश विसर्जनाच्यावेळी गर्दी होवू नये यासाठी ठाणे महानगरपालिका क्षेत्रात गणेशमूर्ती विसर्जनासाठी डिजीठाणे प्रणाली मार्फत ऑनलाईन टाइमस्लॉट बुकिंग सुविधा सुरु झाली असून सदरची सुविधा www.ganeshvisarjan.covidthane.org या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. नागरिकांनी या बुकिंग सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी केले आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी विसर्जनासाठी येणाऱ्या भाविकांची अँन्टीजन चाचणी करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. ठाणे महानगरपालिकेच्यावतीने प्रत्येक विसर्जन ठिकाणी अँन्टीजन चाचणी केंद्र उभारण्यात आले असून या ठिकाणी भाविकांनी चाचणी करून कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहनही महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी केले आहे. यासोबतच श्री गणेशाच्या विसर्जनाच्यावेळी कोणताही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी विसर्जन महाघाट, सर्व कृत्रीम तलावांच्या ठिकाणी सी.सी.टीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading