महाडच्या महास्वच्छता अभियानास सुरुवात – नगरविकासमंत्री स्वतः रस्त्यावर

महाडच्या महास्वच्छता अभियानास सुरूवात झाली असून नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यासाठी स्वत: रस्त्यावर उतरले आहेत. ठाण्यासह विविध महापालिकांचे कर्मचारी आणि आवश्यक साधनसामग्रीच्या मदतीने महाडच्या स्वच्छतेला मोठ्या प्रमाणावर सुरुवात करण्यात आली. नगरविकासमंत्री या नात्याने शिंदे यांनी विविध महापालिकांच्या माध्यमातून आवश्यक मनुष्यबळ आणि यंत्रसामग्रीची जमवाजमव करून महाड गाठले, स्थानिक प्रशासनाच्या मदतीने शहराची चार भागांत विभागणी केली आणि घरोघरी कर्मचारी पाठवून साफसफाईच्या कामाला सुरुवात केली. या सर्व कामावर भर पावसात फिरून शिंदे स्वतः लक्ष ठेवून आहेत. त्याचबरोबर, शहराला स्वच्छतेसाठी वाढीव दीड कोटी रुपये देण्याची घोषणाही त्यांनी केली. त्यांनी यापूर्वीच ५० लाखांची मदत जाहीर केली होती, मात्र झालेले नुकसान पाहाता ती पुरेशी नसल्याचं निदर्शनास आल्याने वाढीव दीड कोटी रुपये देण्याचा निर्णय त्यांनी जाहीर केला. ठाणे महापालिकेचे १५० सफाई कर्मचारी, नवी मुंबई महापालिकेचे १२० सफाई कर्मचारी, पनवेल महापालिकेचे १०० सफाई कर्मचारी, टीडीआरएफ पथकाचे ३० जवान असे मनुष्यबळ या स्वच्छता कामासाठी तैनात करण्यात आले आहे. याशिवाय ठाणे महापालिकेने पाठवलेले ड्रनेज लाइन स्वच्छ करणारे टँकर्स, २० जेसीबी, २० डंपर, पाच घंटागाड्या, ठाणे महापालिकेची काही जेटिंग मशिन्स, ठाणे मनपाचे तीन फायर टँकर्स, महाड नगरपालिकेचे तीन फायर टॅंकर्स, तसेच ठाणे आणि खोपोली वरून घरे स्वच्छ करण्यासाठी आणण्यात आलेले स्प्रेइंग मशीन्स, रोगराई पसरू नये यासाठी धूरफवारणी करणारी फॉगिंग मशिन्स अशा समुग्रीचा समावेश आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading