मलटाकीत होत असलेल्या मृत्युंविरोधात महापालिकेसमोर नागरिकांचे आंदोलन

ठाण्यातील नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी आज ठाणे महापालिकेच्या मुख्यालया समोर धरणे आंदोलन करून शहरात मलटाक्या साफ करण्यासाठी उतरलेल्या सफाई कामगारांच्या झालेल्या मृत्युंबाबत कारवाई करण्यासाठी महापालिकेने दाखवलेल्या अनास्थेविरुद्ध नाराजी प्रकट केली. शहरातील गटारे आणि हाऊसिंग सोसायटी मधली गटारे आणि मलटाक्या साफ करण्यासाठी अति दलित समाजातील सफाई कर्मचारीच सेवा देतात. त्यांच्या आरोग्यासाठी आणि सुरक्षततेसाठी काहीच नियमावली निश्चित केली नसल्यामुळे आणि गटारे साफ करताना आत असलेल्या विषारी वायुमुळे गुदमरून मेलेल्या कामगारांना नुकसान भरपाई देण्यात होत असलेल्या अक्षम्य दिरंगाई विरुद्ध आज अनेक नागरिक तोंडाला काळा रंग लावून निदर्शनात सहभागी झाले होते. श्रमिक जनता संघ, म्युज फाऊंडेशन, जन आंदोलनांचा राष्ट्रीय समन्वय, शोषित जन आंदोलन आदि संघटनांनी सफाई कामगारांवर होत असलेल्या या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी, त्यांना नुकसान भरपाई मिळण्यासाठी आणि हे हाताने मैला सफाईचे काम बंद करावे या मागण्यांसाठी हे धरणे आंदोलन पुकारले होते. हल्लीच्या काळात मलटाक्या साफ करताना होणा-या सफाई कामगारांच्या मृत्युंमध्ये सतत वाढ होत आहे. २९ मार्चला मुंब्र्यात सूरज मढवी आणि हनुमान या सफाई कामगारांचा मृत्यू झाला. त्या आधी ९ मे २०१९ रोजी ठाण्यात प्राइड प्रेसीडेन्सी येथे मल टाक्या साफ करताना अमन, अमित आण अजय या सफाई कामगारांचा मृत्यू झाला. या दोन्ही केसेस मध्ये अजूनही सरकार नुकसान भरपाई आणि पुनर्वसन बाबत काहीही बोलत नाही. ठाणे स्मार्ट सिटि करण्याच्या गर्जना करताना या मनावधिकाराच्या मूलभूत चुकीकडे संपूर्ण दुर्लक्ष केलं जातंय. श्रमिक जनता संघ आणि म्यूज फाऊंडेशन तर्फे ठाण्यातील सीवर डेथ बंद करा , मैन्युअल स्कैवेंजींग प्रतिबंध कायद्याचे पालन करा , एसटीपी टाकीत मरण पावलेल्या सफाई कामगारांचे वारसांना प्रत्येकी दहा लाख नुकसान भरपाई द्या व योग्य पुनर्वसन करा. अश्या मागण्यांचे निवेदन घेऊन एक शिष्टमंडळाने ठाणे महापालिका उप आयुक्त मारूती खोडके यांची भेट घेतली. ठाण्यातील सर्व हाऊसिंग सोसायट्यांना नोटीस काढून परस्पर एसटीपी टाकी सफाई करण्यासाठी प्रतिबंध घालणार आणि योग्य गाईडलाईन निश्चित करणार, जिथे जेटींग गाडी जाऊ शकत नाही तिथे सीवर लाईन, टाकी, चैम्बर्स सफाई कशी करावी, कर्मचाऱ्यांना सुरक्षा साहित्य बाबतीत मैलासफाई करावी लागणार नाही यासाठी उपाययोजना करण्यासाठी लवकरच एक मिटींग अतिरिक्त आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली ड्रेनेज आणि घनकचरा विभागाचे अधिकारी आणि आंदोलक संघटनांचे प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत आयोजित करण्याचे आश्वासन मारूती खोडके आणि मनिष जोशी यांनी शिष्टमंडळाला दिले आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading