मनोरुग्णांसोबत न्यायाधीशांनी चालवली सायकल

ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालय आणि आम्ही cycle प्रेमी फाऊंडेशनच्यावतीने ‘एक राईड मनोरुग्णांसाठी – त्यांच्या सामाजिक पुनर्वसनासाठी’ या वर्षांतील पहिल्या सामाजिक राईडचे आयोजन करण्यात आले होते. यात १०० हून अधिक सायकलप्रेमींनी सहभाग घेतला होता. राईड झाल्यावर मनोरुग्णालयाच्या आवारात प्रमुख पाहुणे जिल्हा आणि सत्र न्यायाधीश अभय मंत्री, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव ईश्वर सुर्यवंशी, मनोरुग्णालयाचे वैदयकीय अधिक्षक डॉ. नेताजी मुळीक आणि आम्ही cycle प्रेमी फाऊंडेशनच्या सदस्यांनी मनोरुग्णांसोबत सायकल चालवली. यावेळी त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत होता. सायकल चालविणाऱ्या मनोरुग्णांना उपस्थित सगळेच प्रोत्साहन देत होते.
ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयापासून सायकल राईड सुरू झाली. डॉ. मुळीक, संस्थेच्या संस्थापिका-अध्यक्षा प्रज्ञा म्हात्रे, सेक्रेटरी दीपेश दळवी आणि इतर सर्व पदाधिकाऱ्यांच्या हस्ते झेंडा दाखवून राईडला सुरूवात करण्यात आली. यात स्पेशल फोर्सचे कमांडो, मनोरुग्णालयाचे डॉक्टर्स, कर्मचारी देखील सहभागी झाले होते. संस्थेतर्फे मनोरुग्णांसाठी सायकल या विषयावर चित्रकला स्पर्धेचे आयोजन केले होते. त्यांच्या चित्रांच्या प्रदर्शनाचे दालन उभारण्यात आले होते. या दालनात व्यवसाय उपचार विभागाच्यावतीने १२ मनोरुग्णांकडून बनवून घेतलेल्या दोन सायकल देखील येथे ठेवण्यात आल्या होत्या. या दालनाचे उद्घाटन जिल्हा -सत्र न्यायाधीश मंत्री यांच्या हस्ते आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव सुर्यवंशी, डॉ. मुळीक आणि आम्ही cycle प्रेमी फाऊंडेशनचे सदस्य वरुण भामरे यांच्या उपस्थितीत करण्यात आले. सायकल आणि पर्यावरण यांची सांगड या चित्रांतून मनोरुग्णांनी घातली होती. मनोरुग्णांच्या अंगी अनेक कला दडलेल्या असतात त्यांना वाव देणे गरजेचे आहे अशा शब्दांत मंत्री यांनी स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व मनोरुग्णांचे कौतुक केले. त्यानंतर मनोरुग्णांसाठी राईड केलेल्या सर्व सहभागींना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले. संस्थेतर्फे मनोरुग्णांना खाऊ आणि भेटवस्तू देण्यात आल्या.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading