मतमोजणी दरम्यान विधानसभा क्षेत्रानिहाय करण्यात आलेल्या विविध रंगांच्या वापरामुळे मतमोजणी अधिक पारदर्शक

ठाणे लोकसभा मतदारसंघातील मतमोजणी उद्या होत असून ही मतमोजणी पूर्णत: पारदर्शक रहावी यासाठी प्रथमच वेगवेगळ्या रंगांचा वापर करण्यात आला आहे. ही माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अनिल पवार यांनी दिली. प्रत्येक विधानसभानिहाय रंग देण्यात आला असून कोणत्याही नेमणूक झालेल्या कर्मचा-यांनी गोंधळून अथवा चुकून दुस-या विधानसभा मतदारसंघाच्या मोजणीत जाऊ नये यासाठी यामध्ये दक्षता घेण्यात आली आहे. ठाणे लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणी दरम्यान मीरारोड विधानसभा क्षेत्रासाठी निळा रंग, ओवळा माजिवडा विधानसभा मतदारसंघासाठी हिरवा रंग, ठाणे विधानसभा मतदारसंघासाठी तपकिरी रंग, कोपरी-पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघासाठी भगवा रंग, ऐरोली विधानसभा मतदारसंघासाठी लाल रंग तर बेलापूर विधानसभा मतदारसंघासाठी पिवळ्या रंगाचा वापर करण्यात आला आहे. प्रत्येक विधानसभा क्षेत्रातील मतमोजणीसाठी नियुक्त झालेल्या कर्मचा-यांना त्या त्या रंगाची ओळखपत्रं दिली जाणार आहेत. प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील राजकीय पक्षाच्या निवडणूक प्रतिनिधींसाठीही त्या विधानसभा क्षेत्राच्या रंगाची ओळखपत्रं दिली जाणार आहेत. स्ट्राँगरूममध्ये मतदान यंत्र नेणा-या कर्मचा-यांना प्रत्येक विधानसभा मतदारसंघासाठी निश्चित करण्यात आलेल्या रंगाची जॅकेट दिली जाणार आहेत. स्ट्राँग रूम ही पहिल्या माळ्यावर असून मतमोजणी ही खालच्या माळ्यावर राहणार आहे. त्यामुळं प्रत्येक विधानसभा मतदारसंघाची मतदान यंत्रं ही त्याच्या रंगानुसार कर्मचा-यांना नेताना सोयीस्कर होणार आहेत. प्रत्येक मतदारसंघाच्या साठी असलेल्या टेबल्स साठीही रंग निश्चित करण्यात आले असल्यामुळं ही मतदान यंत्रं त्या त्या विधानसभा क्षेत्राच्या टेबलावरच जातील. जेणेकरून यामध्ये कोणतीही चूक होणार नाही. अशात-हेनं हे नियोजन करण्यात आलं आहे. रंगाचं नियोजन हे ठाणे लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक अधिकारी अनिल पवार यांनी केलं असून यामुळं पूर्ण यंत्रणा ही पारदर्शक असल्याचा दावा अनिल पवार यांनी केला.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading