मतदानाचा टक्का वाढावा यासाठी जिल्हा प्रशासनाच्या प्रयत्नांवर मतदानाच्या वेळी झालेल्या गोंधळामुळे पाणी फिरलं

मतदानाचा टक्का वाढावा यासाठी जिल्हा प्रशासनानं मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करूनही मतदानाच्या वेळी झालेल्या गोंधळामुळे काही अंशी या प्रयत्नांवर पाणी फिरलं. लोकसभेसाठी काल जिल्ह्यामध्ये मतदान झालं. मात्र यावेळी मतदानाचं प्रमाण वाढण्याऐवजी कमी झाल्याचंच दिसलं. मतदान यंत्रणेतील नियोजनाचा अभाव, मतदान यंत्र बंद पडणं, संथगतीनं मतदान, हवेतील तीव्र उष्मा अशा विविध कारणांचा मतदानावर परिणाम झाला. यातील काही कारणं टाळणं अशक्य होतं. पण नियोजनातील अभाव, संथगतीनं होणारं मतदान यावर मात्र मात करता आली असती, पण ते काही होऊ शकलं नाही. मतदान यंत्रणेत असलेल्या गोंधळाचा फटका राजकीय नेत्यांनाही बसला. महाराष्ट्र विद्यालयात ३ मतदान केंद्रं होती. त्यापैकी एकाच केंद्रावर मतदारांची संख्या अधिक होती तर इतर दोन मतदान केंद्र जवळपास ओस पडली होती. आमदार जितेंद्र आव्हाड यांना या मतदान केंद्रात मतदान करण्यासाठी जवळपास तासभर थांबावं लागलं. तर एका युवतीनं या शाळेतील एक क्रमांकाच्या मतदान केंद्रात मतदान केलं. पण निवडणूक कर्मचारी मतदान केल्याची शाई लावायलाच विसरले. मतदान झाल्यानंतर बाहेर पडल्यावर या मुलीच्या बोटाला शाई लावली नसल्याचं लक्षात आलं. तेव्हा ही युवती परत मतदान केंद्रात जाऊन बोटाला शाई लावून आली. असा अजब प्रकार या ठिकाणी पहायला मिळाला. तर मतदान छायाचित्र ओळखपत्र असलेल्या मतदारांची नावंच मतदान यादीतून गायब असल्याचा प्रकारही अनुभवायला मिळाला. ठाण्यात अनेक वर्ष राहणा-यांची नावं मतदार यादीतून गायब होती. तर परदेशात अनेक वर्षापासून वास्तव्य करणा-यांची नावं मतदार यादीत होती. सुप्रसिध्द खगोल अभ्यासक पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांचं नावही मतदार यादीतून गायब होतं. अशाच प्रकारचे किस्से अनेक मतदार केंद्रातून अनुभवायला मिळाले. अशा प्रकारांमुळं मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी केले गेलेले प्रयत्न वाया गेलेलेच दिसून आले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading