मतदानकेंद्रस्तरीय अधिकारी घरोघरी जाऊन करणार मतदार यादीची पडताळणी – जिल्हाधिकारी

जिल्ह्यातील मतदार यादी परिपूर्ण, दोषविरहित आणि अचूक असावी, यासाठी छायाचित्रासह मतदार यादीचा संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. याअंतर्गत 21 जुलै ते 21 ऑगस्ट या कालावधीत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी हे मतदान केंद्रातील घरोघरी जाऊन मतदार यादीची पडताळणी करणार आहेत अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिनगारे यांनी दिली. छायाचित्रांसह मतदार यादीचा संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी जिल्हाधिका-यांनी राजकीय पक्षांची बैठक घेतली. त्यानंतर प्रसिद्धी माध्यमांना यासंदर्भात माहिती दिली. छायाचित्रांसह मतदार यादीचा संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम हा पूर्वी दोन महिने चालत होता. पहिल्यांदाच हा कार्यक्रम 1 जून ते 31 डिसेंबर या सहा महिन्याच्या कालावधीत राबविला जाणार आहे. जिल्ह्यातील मतदार यादी परिपूर्ण आणि दोषरहित असावी. यासाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी घरोघरी भेटी देऊन मतदारांची नावे आणि नोंदीतील दुरुस्ती तपासणार आहेत. तसेच पात्र असलेले परंतु ज्यांची नावे मतदार यादीत नाहीत त्यांना मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी मदत करणार आहेत. संभाव्य मतदार नोंदणीसाठीही प्रयत्न करणार आहेत. हे करत असताना पात्र आणि योग्य मतदारांची नावे वगळली जाणार नाहीत याची दक्षता घेतली जाणार आहे. राजकीय पक्षांचे मतदान केंद्रस्तरीय सहाय्यकांनीही यासाठी सहकार्य करावे असं जिल्हाधिका-यांनी सांगितलं. या कार्यक्रमाअंतर्गत दुसऱ्या टप्प्यात मतदान केंद्रांचे सूसुत्रीकरण करण्यात येणार आहे. याअंतर्गत पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावर असलेल्या 224 मतदान केंद्र हे तळमजल्यावर स्थलांतरीत करण्यात येणार आहेत. त्यासाठी शासकीय, निमशासकीय इमारतींची माहिती घेत आहोत. जिल्ह्यासाठी पंचकुला (हरियाणा) आणि बेंगलोर येथून मतदान यंत्रे मिळणार आहे. ही मतदान यंत्रे तीन गोदामामध्ये सुरक्षितपणे ठेवण्यात येणार असून राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत त्यांची प्रथमस्तरावरील तपासणी करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. मतदार यादीत महिला आणि युवकांच्या नोंदणीचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे मतदानाची टक्केवारी कमी होते. यासाठी जिल्ह्यातील महिला, युवा मतदारांची संख्या वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यासाठी शाळा महाविद्यालयांमध्ये मतदान नोंदणी शिबिर, समाज माध्यमांद्वारे जनजागृती, गृहनिर्माण सोसायट्यांमार्फत शिबिर आदी उपक्रम राबविण्यात येत आहे. राजकीय पक्षांनी यासाठी सहकार्य करावे. जास्तीत जास्त महिला आणि युवकांनी मतदार यादीत नाव नोंदविण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहनही जिल्हाधिकारी शिनगारे यांनी यावेळी केले.
जिल्ह्यातील आकडेवारी

· जिल्ह्यातील लोकसभा मतदारसंघ – 3

· विधानसभा मतदार संघ – 18

· एकूण मतदार – 62,14,517

· पुरुष मतदार – 33,67,120

· महिला मतदार – 28,46,319

· तृतीय पंथीय मतदार – 1078

· एकूण मतदान केंद्रे – 6391

· कार्यरत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी – 5402

 

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading