भिका-याला भीक देऊ नका पण त्याला मदत नक्की करा – डॉ. अभिजित सोनावणे

कुठल्याही भिका-याला भीक देऊ नका पण त्याला मदत नक्की करा. भीक देणं म्हणजे भिका-याला परावलंबी करणं आहे तर मदत करणं म्हणजे भिका-याला स्वावलंबी बनवणं आहे. असे आर्जव भिका-यांमध्ये कार्य करणा-या डॉ. अभिजित सोनावणे यांनी ठाण्यात बोलताना केलं. रामभाऊ म्हाळगी व्याख्यानमालेत डॉक्टर फॉर बेगर्स या विषयावर ते बोलत होते. २ रूपये भीक दिल्यानं ४ जण आपल्याकडे कर्णाचा अवतार म्हणून बघत असल्याचं पाहून आपला इगो सुखावतो. पण आपल्या अशा वागण्याने आपण भिका-याला त्याच ठिकाणी त्याच परिस्थितीत ठेवतो याची जाणीव आपल्याला नसते. यामुळं भुकेल्याला जेवण जरूर द्या पण फुकट खायची सवय लावू नका असे डॉ. सोनावणे यांनी सांगितलं. भीक मागताना लहान मुलं दिसली तर वर्गणी काढा, त्यांना शिकवा, गणवेश- पुस्तकं द्या पण भीक देऊ नका. यात जर महिला असतील तर साड्या विकण्यासाठी मदत करा पण भीक देऊ नका. भीक मागणारा वृध्द असेल तर चहा विकण्यासाठी मदत करा पण भीक देऊ नका. भिका-यांना काम देता येत नसेल तर काहीच करू नका पण भीक देऊन आम्ही करत असलेल्या कामावर पाणी फिरेल म्हणून भीक देऊ नका. भिका-यांना भीक परावलंबी बनवते तर मदत स्वावलंबी करते म्हणून भीक देण्यापेक्षा मदत करा असे आवाहन डॉ. अभिजित सोनावणे यांनी केले. डॉ. अभिजित सोनावणे यांनी एका आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या संस्थेत २ लाखांची नोकरी करत असताना आणि १२ लाख वेतनाची ऑफर आली असताना ती सोडून त्यांनी आणि त्यांची पत्नी मनिषा सोनावणे यांनी भिका-यांच्या सेवेसाठी आपले आयुष्य वाहून घेतले. डॉक्टर झाल्यावर सोनावणे यांनी घरातून एकही पैसा न घेता वैद्यकीय व्यवसाय सुरू करण्याचा प्रयत्न केला. भाड्यानं खोली घेऊन दवाखाना सुरू करणं शक्य नसल्यानं झोपडपट्टीतच दवाखाना सुरू केला. पण हा दवाखाना न चालल्यामुळं एका आज्जीबाईंच्या सांगण्यावरून खेड्यात त्यांनी होम डिलीव्हरी डॉक्टर म्हणून व्यवसाय सुरू केला. त्यात आलेल्या अनुभवाने त्यांना अनुभव समृध्द बनवले. डॉ. सोनावणे यांनी भिका-यांना स्वाभिमानाने जगायला शिकवण्याचा प्रयत्न केला. नात्यातील माणसांना घराबाहेर काढले नाही तर भिकारीच निर्माण होणार नाहीत यामुळे भविष्यात भिकारी निर्माण होणार नाहीत आणि हे काम बंद पडेल यासाठी प्रयत्न करण्याचं आवाहन डॉ. अभिजित सोनावणे यांनी यावेळी केलं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading