भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती नियमाचे पालन करुन साध्या पध्दतीने साजरी करण्याचे जिल्हाधिका-यांचे आवाहन

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती कोविडच्या दुसऱ्या लाटेमुळे उद्भवलेल्या अतिसंसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता आणि वाढत्या कोरोना रुग्णांच्या संख्येचा विचार करता महसूल आणि वन विभाग, आपत्ती व्यवस्थापन, मदत आणि पुनर्वसन, मंत्रालयाकडून साधेपणाने साजरी करण्याचे आवाहन करण्यात आलं आहे. तसेच या संदर्भात राज्य शासनाकडून मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात आल्या आहेत या सुचनांचे नागरिकांनी पालन करुन प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी केले आहे. दरवर्षी 14 एप्रिल रोजी बाबासाहेब आंबेडकरांचे अनेक अनुयायी मोठ्या संख्येने जमुन तसेच जयंती दिनाच्या आदल्या दिवशी मध्यरात्री 12 वाजता एकत्र येऊन राज्यात ठिकठिकाणी साजरी करतात. परंतु यावर्षी कोविडचा वाढता प्रादुर्भाव टाळण्यासाठी अत्यंत साधेपणाने सकाळी 7 वाजेपासून संध्याकाळी 8 वाजण्यापूर्वी आंबेडकर जयंती साजरी करणे अपेक्षित आहे. यावर्षी कोविड विषाणूचा वाढता प्रादुर्भाव विचारात घेता दरवर्षीप्रमाणे प्रभातपेरी, बाईक रॅली, मिरवणुका यावेळी जयंती निमित्ताने काढण्यात येऊ नयेत. त्याऐवजी आंबेडकरांच्या पुतळ्याला अथवा प्रतिमेला पुष्पहार अर्पण करताना त्या ठिकाणी अनुयायांची संख्या एकावेळी 5 पेक्षा जास्त नसावी. तसेच सोशल डिस्टंन्सिंगच्या आणि स्वच्छतेच्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करुन जयंती साजरी करावी. चैत्यभुमी, दादर मुंबई येथे आंबेडकरांना शासकीय मानवंदना देण्यासाठी मुख्यमंत्री, राज्यपाल उपस्थित राहणार असल्याने या कार्यक्रमासाठी 50 पर्यंत व्यक्ती उपस्थित राहू शकतील. तसेच दिक्षाभूमी नागपूर येथील कार्यक्रमासाठी 50 व्यक्तींना परवानगी असणार आहे. चैत्यभुमी, दादर येथे गर्दी करण्यास निर्बंध असल्याने मुंबईसह महाराष्ट्रातील अन्य रेल्वे स्थानकावरही गर्दी करण्यास निर्बंध आहेत. शासनाकडून चैत्यभुमी, दादर येथील कार्यक्रमाचे दुरदर्शनवरुन थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. नागरिकांनी चैत्यभुमीवर न येता घरातूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करावे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती दिनी आरोग्यविषयक उपक्रम, रक्तदान शिबिरे,स्थानिक प्रशासनाच्या पुर्वानुमतीने आयोजित करता येतील आणि त्याद्वारे करोना, मलेरिया डेंग्यू इत्यादी आजार आणि त्यांचे प्रतिबंधात्मक उपाय तसेच स्वच्छता याबाबत जनजागृती करता येईल तथापि आरोग्य विषयक उपक्रमांचे आयोजन करताना त्या ठिकाणी सोशल डिस्टसिंग तसेच स्वच्छतेचे नियम पाळण्याकडे विशेष लक्ष देण्यात यावे. तसेच या आदेशानंतर प्रत्यक्ष जयंती दिनाचा कार्यक्रम सुरु होण्याच्या मधल्या कालावधीत शासन स्तरावरून आणखी काही मार्गदर्शक सूचना प्रसिध्द झाल्यास त्यांचे देखील अनुपालन करावे असे आवाहन जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी केले आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading