भाजपाकडून ठाण्यातही शिवसेनेची पोलखोल

मुंबई महापालिकेपाठोपाठ ठाण्यातही भाजपाकडून सत्ताधारी शिवसेनेने पाच वर्षांच्या सत्ताकाळात केलेल्या भ्रष्टाचाराची पोलखोल करण्यात येणार आहे. ठाणे महापालिकेतील भ्रष्टाचाराच्या विविध ५० प्रकरणांवर काळी पुस्तिका प्रसिद्ध केली जाणार असून शहरात ठिकठिकाणी कॉर्नरसभांसह प्रदर्शनही भरविण्यात येणार आहे. भारतीय जनता पक्षाच्या ठाणे कार्यालयात आज झालेल्या पत्रकार परिषदेत माजी खासदार किरीट सोमय्या, आमदार निरंजन डावखरे आणि आमदार संजय केळकर यांनी ही माहिती दिली. ठाणे महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेने कोविड आपत्तीसह पाच वर्षांच्या काळात विविध विभागांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार केला. नागरी सुविधांच्या कामांसह बॉलिवूड पार्क, थीम पार्क, बीएसयूपीसह तब्बल ५० प्रकरणांमध्ये भ्रष्टाचार झाला आहे. या प्रकरणातील भ्रष्टाचाराचे पुरावे देत काळी पुस्तिका प्रसिद्ध केली जाईल. त्याचबरोबर व्हीडीओ क्लिप आणि छायाचित्रे तयार करून प्रदर्शन भरविले जाईल. शहरात ठिकठिकाणी कॉर्नर सभा घेऊन शिवसेनेच्या भ्रष्टाचाराची पोलखोल केली जाईल, अशी माहिती संजय केळकर यांनी दिली. पोलखोल करण्यासाठी भाजपाचे माजी नगरसेवक, पदाधिकारी यांची समिती स्थापन करण्यात आली आहे तर ठाणे महापालिकेत आढळलेल्या भ्रष्टाचाराचे अनुभव नागरिकांनी भाजपा कार्यालयात पाठवावेत, असे आवाहन माजी खासदार किरीट सोमय्या यांनी दिले. माजी खासदार किरीट सोमय्या यांनी आज मनसुख हिरेन यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. मनसुख हे आरोपी नसून, पीडित असल्याचे एनआयएने स्पष्ट केले. त्यामुळे तब्बल तीन महिन्यांनंतर हिरेन कुटुंबियांना दिलासा मिळाला, असे सोमय्या यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. त्याचबरोबर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हिरेन कुटुंबियांची माफी मागावी अशी मागणीही केली. प्रदीप शर्मा आणि सचिन वाझे यांची पुन्हा पोलिस दलात नियुक्ती कशी झाली त्यामागील सुत्रधाराचा तपास करण्यासाठी पुढील आठवड्यात `एनआयए’ अधिकाऱ्यांची भेट घेणार असल्याचंही किरीट सोमय्या यांनी सांगितले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading