बिल्डर्सचा कट उधळून लावण्यासाठी आलिशान घर सोडून म्हाडाच्या घरात रहायला आले मधुर राव

वर्तकनगर येथील सुस्थितीत असलेल्या इमारती धोकादायक ठरवून १६० रहिवाशांना बेघर करण्याचा कट बिल्डर्स लॉबीकडून आखण्यात आला आहे. हा कट उधळून आपल्या बालपणीच्या काळातील शेजाऱ्यांना बळ देण्यासाठी स्वतःचे एशियाटिक सोसायटीमध्ये असलेले अलिशान घर सोडून मधुर राव हे चक्क वर्तकनगर येथील म्हाडाच्या घरात रहावयास आले आहेत. वर्तकनगर परिसरात म्हाडाच्या ७५ इमारती आहेत. या इमारती जुन्या असल्याने या इमारती पाडून नव्याने गृहनिर्माण प्रकल्प राबविण्यात येणार आहेत. त्याचाच एक भाग म्हणून  क्रमांक ४५ आणि ४७ या  इमारतींचा पुनर्विकास करण्यात येणार आहे. या पुनर्विकासासाठी पुनित बिल्डर्सने पुढाकार घेतला आहे. मात्र इतर ठिकाणी रहिवाशांची फसवणूक होत असल्याने रहिवाशांनी म्हाडाने घालून दिलेल्या नियमानुसार क्षेत्रफळ देण्यात यावे, वाजवी दरानुसार घरभाडे द्यावे, अनामत रक्कम द्यावी,  अशी मागणी बिल्डर्सकडे केली होती. मात्र बिल्डर प्रतिक पाटील यांनी ४३० चौरस फूट क्षेत्रफळ देणार असल्याचे सांगितले. त्यावर रहिवाशांनी  ४८४ चौ. फूट क्षेत्रफळ देण्याबाबतचे म्हाडाकडून पत्र  आणून सादर केल्यानंतर बिल्डर्सने रहिवाशांना त्रास देण्यास सुरूवात केली आहे. बिल्डरने महापालिका अधिकाऱ्यांना सोबत घेऊन या दोन्ही सुस्थितीतील आणि जुजबी दुरूस्तीनंतर वापरण्यायोग्य असलेल्या इमारती स्ट्रक्चर ऑडिटमध्ये अतिधोकादायक ठरवून ४८ तासात रिकाम्या करण्याचे आदेश दिले. या इमारती रिकाम्या करून १६० कुटुंबियांस बेघर करण्याचा कट बिल्डरने रचला आहे. हा कट उधळून लावण्यासाठी एशियाटिक सोसायटीमध्ये असलेले अलिशान घर सोडून  आपल्या जुन्या शेजार्यांना नैतिक पाठबळ देण्यासाठी राव वर्तकनगरात रहावयास आले आहेत. या ठिकाणी राहूनच आपण  बिल्डर विरोधात लढा देणार असून कमिटी मेंबर्सच्या चुकीच्या विकास प्रस्तावाला आणि गैर हालचालींना आळा घालणार आहोत, असे मधूर राव यांनी सांगितले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading