बदलापूर, वांगणी, म्हारळ, वरप परिसरात आता रोगराई पसरू न देण्याचे आरोग्य यंत्रणेसमोर आव्हान

बदलापूर, वांगणी, म्हारळ, वरप परिसरातील पूरग्रस्तांची सुटका केल्यानंतर आता या परिसरात रोगराई पसरू न देण्याचे आव्हान आरोग्य यंत्रणेसमोर असून या संपूर्ण परिसरात डेंग्यू, लेप्टोस्पायरोसिस, मलेरिया सारखे आजार पसरू नयेत, यासाठी आवश्यक त्या औषधांचे वाटप करण्याचे आदेश आरोग्यमंत्री आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. ठिकठिकाणी आरोग्य शिबिरांचे आयोजन करून नागरिकांची तपासणी करून रोगराईच्या संदर्भात वेळीच प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे आदेशही त्यांनी दिले. राजकीय नेते म्हणजे केवळ यंत्रणांना आदेश देणारे असे सर्वसाधारण चित्र असताना शनिवारी बदलापूर, वांगणी परिसरातील पुरात अडकलेल्यांच्या सुटकेसाठी एकनाथ शिंदे यांना स्वतः पाण्यात उतरून, जीव धोक्यात घालून दिवसभर मदतकार्यात स्वतःला वाहून घेतलेले होते. पुराच्या पाण्यात अडकलेल्या महालक्ष्मी एक्स्प्रेसमधील प्रवाशांच्या सुटकेसाठी मदतपथक पोहोचले, पण महिला, लहान मुले, ज्येष्ठ नागरिक असे अनेक प्रवासी जिवाच्या भीतीने बाहेर यायला तयार नव्हते. अशा वेळी एकनाथ शिंदे यांनी पाण्यातून वाट काढत महालक्ष्मी एक्स्प्रेसपर्यंत पोहोचून प्रवाशांशी संवाद साधला आणि त्यांची समजूत काढून त्यांना गाडीबाहेर यायला राजी केले. अशाच प्रकारे एनडीआरएफ, टीडीआरएफ आणि नौदलाच्या बोटींमधून बदलापूर, वांगणी, म्हारळ, वरप या परिसरातील कानाकोपऱ्यात पोहोचून तिथे अडकलेल्या नागरिकांची स्वतःच्या देखरेखीखाली सुटका केली. केवळ शासकीय यंत्रणाच नव्हे तर शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी आणि शिवसैनिकांची मजबूत फळी घेऊन पालकमंत्री एकनाथ शिंदे मदतकार्यात उतरले. एनडीआरएफ आणि टीडीआरएफच्या जवानांशी सातत्याने सल्लामसलत करून, स्वतः त्यांच्यासोबत बोटीने ठिकठिकाणी फिरून पाण्यात अडकलेल्या नागरिकांची सुखरूप सुटका होईल, याची काळजी एकनाथ शिंदे यांनी घेतली. राज्यात मुंबईसह नवी मुंबई, ठाणे, कोकण विभाग, नाशिक, पश्चिम महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे बऱ्याच ठिकाणी पूरस्थिती तसेच पाणी साचल्याच्या घटना घडल्या आहेत. अशा स्थितीत साथ रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याचा संभव लक्षात घेऊन आरोग्य विभागाने स्वाइन फ्लू, डेंग्यू, लेप्टोस्पायरोसिस सारख्या आजारांचा प्रतिबंध करण्यासाठी आरोग्य शिबीर आयोजित करावीत, औषध आणि धूर फवारणी करावी, प्रतिबंधात्मक गोळ्यांचे वाटप करून नागरिकांना सजग राहण्याच्या सूचना द्याव्यात, असे निर्देश आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading