प्राच्यविद्या अभ्यास संस्थेतर्फे ठाण्यात दुर्ग अभ्यास वर्गाचे आयोजन

प्राच्यविद्या अभ्यास संस्थेतर्फे ठाण्यात दुर्ग अभ्यास वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. ठाण्यातील इतिहास आणि दुर्ग प्रेमींनी या अभ्यास वर्गास चांगला प्रतिसाद दिला. दुर्ग या संकल्पनेची पुरातत्त्वीय दृष्टिकोनातून लोकांना ओळख करून देणे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांविषयीच्या धोरणांचा परिचय करून देणे तसेच शास्त्रशुद्ध पद्धतीने दुर्गसंवर्धन कसे करावे याविषयीचे मार्गदर्शन लोकांना करणे ही हा वर्ग आयोजित करण्यामागची महत्त्वाची उद्दिष्टे होती. एकूण तीन दिवस चालेल्या या वर्गात डॉ. सचिन जोशी, महेश तेंडुलकर आणि अंकुर काणे यांनी मार्गदर्शन केले. दुर्ग या शब्दाची व्युत्पत्ती, दुर्गांचे प्राचीन काळातील साहित्यिक तसेच शिलालेखीय उल्लेख, दुर्गांचे पुरातत्वीय उत्खननातून मिळालेले अवशेष या विषयीची चर्चा अंकुर काणे यांनी प्राचीन काळातील दुर्ग या आपल्या व्याख्यानात केली. दुर्गांवर आढळणारे विविध प्रकारचे स्थापत्य विशेष बुरुज, तटबंदी, प्रवेशद्वारे, पाण्याची टाकी, तोफा आणि इतर या विषयी सचिन जोशी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले तसेच आपल्या पुढील व्याख्यानात दुर्ग संवर्धन म्हणजे काय आणि शास्त्रशुद्धपणे ते कसे करता येईल या विषयी उपस्थितांशी संवाद साधला. महेश तेंडुलकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील दुर्ग या विषयावर अभ्यासपूर्ण व्याख्यान दिले तसेच अंकुर काणे यांनी राजमाची किल्ल्याचा इतिहास आणि तेथील पुरातत्त्वीय अवशेष उपस्थितांना छायाचित्रांच्या साहाय्याने समजावून सांगितले. संस्थेमार्फत पुढील काळात प्राचीन मंदिरे, लेणी, नाणी, पुरातत्व अश्या विविध विषयांवर कार्यशाळा आणि अभ्यास वर्ग आयोजित करण्यात येणार असून संस्थेच्या संकेत स्थळावर याविषयी माहिती लवकरच प्रकाशित करण्यात येईल.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading