प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत सुमारे ६७ हजार लाभार्थींची माहिती वेबपोर्टलवर

जिल्ह्याच्या ६ तालुक्यांमधील ९५४ गावांमधून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थींची नोंदणी वेगाने पूर्ण होत असून परिशिष्ट अ प्रमाणे सध्या ६९ हजार २६६ पात्र शेतकरी कुटुंबे असून त्यापैकी ६६ हजार ५३७ शेतकऱ्यांची माहिती एनआयसीच्या पोर्टलवर देण्यात आली आहे. या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या या कामामुळे जिल्ह्यातील शेतकरी कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळण्याचा मार्ग सुकर झाला आहे. ज्यांनी अद्याप माहिती आणि कागदपत्रे दिली नसतील अशांनी ती त्वरित उपलब्ध करून द्यावी असे आवाहनही जिल्हाधिका-यांनी केले आहे. या योजनेअंतर्गत कल्याण तालुक्यातील पात्र कुटुंबाची संख्या ७ हजार ५५६ आहे. अंबरनाथ तालुक्यात ४ हजार ७३७, भिवंडी तालुक्यात १६ हजार १४१, शहापूर तालुक्यात १८ हजार ५८७, मुरबाड १९ हजार ५१६ तर ठाणे तालुक्यातील पात्र कुटुंबांची संख्या २ हजार ७२९ आहेत. याव्यतिरिक्त अद्यापही कागदपत्रे सादर न केलेल्या आणि ज्यांची जमीन पाच एकरपेक्षा कमी असेल अशा शेतकरी कुटुंबांनी तसेच जे कुटुंब स्थलांतरीत झाले असतील किंवा ज्या शेतकऱ्याचा मृत्यू झाला असेल त्यांच्या कुटुंबियांनी आपली कागदपत्रे आधार कार्ड, बँकेचे पासबूक आणि बँकेचा आयएफएस कोड यांच्यासह तातडीने गावचे तलाठी, कृषी सहायक अथवा ग्रामसेवक यांच्याकडे सादर करावीत असे आवाहन जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी केले आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading