पुण्याच्या घटनेतील तरुणीचा जीव वाचवणाऱ्या तरूणांचा जितेंद्र आव्हाडांनी केला सत्कार

पुण्यात माथेफिरूच्या हल्ल्यातून तरूणीला वाचविणारे लेशपाल जवळगे, हर्षद शिंदे आणि दिनेश मढवी यांचा आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते आव्हाड यांच्या घरी सत्कार करण्यात आला. यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी, महाराष्ट्रातून आता कायद्याचे भयच संपले आहे. ज्यांच्या पायात बेड्या अडकवल्या पाहिजेत, त्यांना मोकळे सोडले जात आहे अणि जे निर्दोष आहेत, त्यांच्या मागे कायद्याचा ससेमिरा लावला जात आहे अशा शब्दात टीका केली. पुण्यातील सदाशिव पेठेत एका माथेफिरू तरूणाने एकतर्फी प्रेमातून तरुणीवर कोयत्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे लेशपाल जवळगे, हर्षद शिंदे आणि दिनेश मढवी यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता मुलीचा जीव वाचविला होता. तसेच यावेळी जमावाच्या उद्रेकातून हल्लेखोर तरूणालाही वाचविले होते. आज या तिघांचा सत्कार करून त्यांना पारितोषिक देण्यात आले. गेल्या काही दिवसांपासून देशात प्रचंड द्वेष वाढीस लागला आहे. एकतर्फी प्रेमातून अनेक मुलींच्या हत्या करण्यात येत आहेत. पण दांडगट लोकांच्या समोर एका मुलीवर हल्ला होत असताना कोणीही पुढे येत नाहीत याचा राग येत आहे. मात्र या तिघांनी ओळख पाळख नसताना हिमतीने पुढे झाले आणि त्यांनी मुलीला तर वाचविलेच पण त्यानंतर हिरोगिरी करण्यासाठी पुढे आलेल्या जमावातील काही लोकांना अडवून या तिघांनी मारेकऱ्यांचाही जीव वाचविला. सर्वात द्वेषजनक म्हणजे लोक मारेकऱ्यांची जात विचारत होते. जातीचे राजकारण करून मॉब लिंचिंग करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना आपण हे सांगू इच्छितो की, शिवरायांकडून शौर्याचा तर फुले- शाहू- आंबेडकर यांच्याकडून मानवतेचा वारसा मिळाला आहे. हा वारसा लेशपाल जवळगे, हर्षद शिंदे आणि दिनेश मढवी यांनी जपला आहे. असे ही जितेंद्र आव्हाड म्हणाले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading