‘पिंक बुक’चे जिल्हाधिका-यांच्या हस्ते प्रकाशन

अनैतिक मानवी वाहतुकीमध्ये सापडलेले पिडीत, कठिण परिस्थितीतून गेलेल्या महिला, अनाथ बालके तसेच ज्येष्ठ नागरिक, कामगार, यासह सर्वच दुर्लक्षित घटकांना समाजात मानाचे स्थान मिळावे आणि त्यांना न्याय हक्क मिळवून देण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करण्याची ग्वाही समाजाला देऊ असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी केले. महिला आणि बालविकास विभाग तसंच यु कॅन फ्री अस इंडिया संस्थेच्या वतीने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव न्या. ईश्वर सूर्यवंशी, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी महेंद्र गायकवाड, बाल कल्याण समिती अध्यक्ष राणी बैसाने, यू कॅन फ्री अस इंडियाच्या संस्थापक सुजॉय जॉन, मुख्य कार्यकारी अधिकारी शीतल कलांजली, जिल्हा तपासणी समितीचे सदस्य डॉ. सुधीर सावंत आदी उपस्थित होते.
यावेळी सुजॉय जॉन यांनी लिहिलेल्या ‘पिंक बुक – अ लाईफ स्किल्स रिसोर्स’ या पुस्तिकेचे जिल्हाधिकारी यांच्या हस्ते प्रकाशन झाले.
गेल्या दोन दिवसांपूर्वी अनाथ बालकांना पालक मिळवून देण्याचे काम करू शकलो याचा मनस्वी आनंद आहे. आयुष्यातील आपल्या सेवेतील हा अत्युच्च क्षणापैकीचा एक क्षण होता. आज समाजातील उपेक्षित, कठिण परिस्थितीतून गेलेल्या आणि मानसिक कुचंबणेतून बाहेर येऊन सर्वसामान्यांचे जीवन जगण्याचा प्रयत्न करण्यासाठी काम होत आहे, याचा आनंद होत आहे. महिलांच्या कौटुंबिक हिंसाचार, अनैतिक मानवी वाहतूक यामुळे पुरुषप्रधान संस्कृतीत महिलांच्या कर्तृत्वाला वाव मिळाला नाही, ही वस्तुस्थिती आहे. याकडे दुर्लक्ष करता येणार नाही.
समाजाला घडविण्याचे काम राजमाता जिजाऊ यांच्यासारख्या नारीशक्तीने केले आहे. त्यांच्या शिकवणीमुळे छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासारख्या द्रष्ट्या नेत्यांनी मानसिक स्वातंत्र्य मिळवून देण्याचे महान कार्य केले. त्यांनी जर ते केले नसते तर कदाचित आजही आपण मानसिक गुलामगिरीत राहिलो असतो. थोर महापुरुषांना त्यांच्या मातांनी जी शिकवण दिली ती शिकवण समाजात देण्याचे काम करू असं जिल्हाधिका-यांनी यावेळी बोलताना सांगितलं.
समाजातील दुर्बल घटक, महिला आणि बालकांच्या सबलीकरणातून समाज घडविण्याचे काम करताना मिळणारे आत्मिक समाधान इतर कुठल्याही गोष्टीतून मिळत नाही. महिला अत्याचाराबरोबरच पोक्सो कायद्याविषयी समाजात जनजागृती होणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रत्येक शाळेत यासंदर्भात विशेष उपक्रम राबविण्यात यावे. दुर्बल घटकांना कायदेविषयक सहाय्य करण्यासाठी विधी सेवा प्राधिकरण काम करत आहे. तसेच अत्याचार पिडितांसाठी मनोधैर्य योजनेद्वारे मदत दिली जाते. यांची माहितीही नागरिकांपर्यंत पोचविण्यात यावे असं जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव न्या. ईश्वर सूर्यवंशी यांनी सांगितलं.

 

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading