पालिकेतील 35 वर्षांवरील सर्व महिला कर्मचारी – अधिकाऱ्यांची आरोग्य तपासणी महापालिका विनामूल्य करणार

ठाणे महापालिच्या महिला अधिकारी आणि कर्मचा-यांच्या आरोग्याच्या दृष्टीकोनातून महिलांमध्ये उद्भवणाऱ्या दुर्धर आजारांचे वेळीच निदान व्हावे यासाठी सोनोमॅमोग्राफी, पॅप स्मीयर, रक्तातील साखरेचे प्रमाण, रक्तदाब, मुखाचा कर्करोग या चाचण्या आणि मोफत आरोग्य तपासणी करण्याचा निर्णय आयुक्त अभिजित बांगर यांनी घेतला आहे. जगभरात असंसर्गजन्य आजारांमुळे यामुळे सुमारे ७४ टक्के नागरिकांचा मृत्यू होतो. त्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेने अशा आजारांवर प्रतिबंध आणि नियंत्रण ठेवण्याचे ध्येय ठेवलेले आहे. कुटूंबातील सदस्यांवर आणि सामाजिक अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम पाहता, अशा आजारांच्या आवश्यक असलेल्या तपासण्या वेळीच करून त्यावर त्वरीत उपचार करणे, ही काळाची प्राथमिक गरज आहे. तसेच मधुमेह आणि रक्तदाब हे आजार रुग्णांच्या नकळत त्यांच्या दैनंदिन जीवनामध्ये घर करुन मृत्यूस कारणीभूत ठरत असतात. महिलांमध्ये स्तनाचा आणि गर्भपिशवीचा कर्करोग या आजारांचे प्रमाण जास्त आहे. अशा प्रकारच्या आजारांची तपासणी करून ते समुळ नाहीसे करणे शक्य आहे. यासाठी महिलांनी देखील गांभिर्याने आणि काळजीपूर्वक अशा चाचण्या करुन घेणे गरजेचे आहे. महापालिकेच्या आस्थापनेवरील ३५ वर्ष किंवा ३५ वर्षांवरील महिला अधिकारी आणि कर्मचा-यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी सोनोमॅमोग्राफी, पॅप स्मीयर, रक्तातील साखरेचे प्रमाण, रक्तदाब, मुखाच्या कर्करोगाची मोफत तपासणी करण्यासाठी राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालय आणि छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाचे अधिष्ठाता यांना आयुक्त बांगर यांनी निर्देश दिले आहेत. तसेच या अनुषंगाने छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय आणि राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालय येथे या आजारांच्या चाचण्या करण्यात येणार असल्याचे आयुक्त यांनी सांगितले. महापालिकेच्या माध्यमातून सोनोमॅमोग्राफी आणि रक्ततपासण्यासाठी शुल्क आकारले जात होते. मात्र आता या सर्व चाचण्या महापालिकेतील महिला अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी मोफत केल्या जाणार असून यापुढे सातत्याने ही योजना महापालिकेतील अधिकारी कर्मचारी महिलांसाठी सुरू राहणार आहे. या योजनेचा फायदा घेवून महापालिकेतील महिला अधिकारी कर्मचाऱ्यांनी आपल्या सुदृढ आरोग्यासाठी प्राधान्याने या चाचण्या करुन घ्याव्यात, असे आवाहन आयुक्त बांगर यांनी केले आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading