पालघर पोलीसांनी मुसळधार पावसात गेल्या दोन दिवसात जवळपास २२ लोकांचे वाचवले प्राण

पालघर पोलीसांनी गेल्या दोन दिवसात झालेल्या मुसळधार पावसात जवळपास २२ लोकांचे प्राण वाचवले आहेत. हवामान विभागानं कोकण किनारपट्टी परिसरात अति पर्जन्यवृष्टी होऊन पूरस्थिती निर्माण होण्याचा इशारा दिला होता. त्या पार्श्वभूमीवर पोलीस अधिक्षक दत्तात्रय शिंदे आणि त्यांच्या पथकानं कोणतीही जिवित अथवा वित्तहानी होऊ नये यासाठी सतर्कता बाळगली होती. पूरस्थिती निर्माण झाल्यास लोकांना सुरक्षित स्थळी हलवणं, धोकादायक रस्त्यावर जाऊ न देणं अशी काळजी घेण्यात आली होती. स्वत: पोलीस अधिक्षक तसंच त्यांचे वरिष्ठ सहकारी वेगवेगळ्या परिसराला भेट देऊन पोलीसांचं मनोबल वाढवत होते. तलासरीमध्ये झालेल्या मोठ्या पावसात कळू नदीनं धोक्याची पातळी ओलांडली होती. पुराच्या पाण्यामुळे आजूबाजूच्या वाड्या, घरांमध्ये पाणी शिरलं होतं. यावेळी ७ जणांचा जीव वाचवताना महेश देवजी आणि इतर दोघेजण पुराच्या पाण्यात अडकल्याची माहिती मिळाली होती. त्यावेळी पोलीस निरिक्षक अजय वसावे आणि त्यांच्या पथकानं पुराच्या पाण्यात शिरून महेश देवजी यांच्यासह ९ जणांना पूरातून बाहेर काढून त्यांचे प्राण वाचवले. कासामध्ये डोंगरावरून आलेल्या पाण्याच्या लोंढ्यात विजय लिलका यांची ५ वर्षाची मुलगी ममता पाण्यात वाहून गेल्याची माहिती मिळताच सिध्दवा जायभाय आणि त्यांचे सहकारी राजू चौधरी, नवले, सहारे आणि सोनवणे यांच्यासह आपत्कालीन पथकानं शोधमोहिम सुरू केली आणि ही मुलगी ज्या ठिकाणाहून वाहून गेली होती तिथून तिची सुटका केली. शोध मोहिमेतील एका व्यक्तीला एका मुलीच्या मुसमुसण्याचा आवाज आल्यानं त्याकडे लक्ष केंद्रीत करून शोध घेतला असता ही मुलगी एका झाडाला अडकली होती. तिथून तिची सुटका करण्यात आली. केळवा परिसरात खारटनामध्ये पाण्याची पातळी वाढली असताना त्यात सागर आणि सारिका चौधरी या दाम्पत्यासह १० ते १२ पुरूष अडकले होते. याची माहिती मिळताच आपत्कालीन परिस्थितीत वापरायच्या साधनसामुग्रीच्या सहाय्यानं त्या सर्वांची या पाण्यातून सुटका करण्यात आली. घोलवडमध्ये काल जोरदार पावसानं रस्त्यावर दरड कोसळली होती. त्यामुळं वाहतूक ठप्प झाली होती. घोलवड पोलीस ठाण्याच्या प्रकाश सोनावणे आणि त्यांच्या सहका-यांनी मुसळधार पावसात सलग दोन तासांच्या अथक प्रयत्नाने रस्त्यावरील दगडगोटे आणि माती बाजूला करून रस्त्यावरील दगडगोटे बाजूला करण्यात यश मिळवलं. सातपाटी परिसरात पुराच्या पाण्यात एका झाडावर अडकलेल्या हरिओम मिश्रा यांचीही जितेंद्र ठाकूर आणि त्यांच्या पथकानं वडाच्या झाडावरून सुटका केली. ते वेळेत पोहचले नसते तर दुर्घटना घडली असती. सफाळ्यामध्येही माती, दगडाचा ढिगारा रस्त्यावर कोसळून वाहतूक ठप्प झाली होती. त्यावेळी सुनील जाधव आणि त्यांच्या पथकानं स्थानिक नागरिकांच्या सहाय्यानं रस्त्याच्या मधोमध पडलेले लहान मोठे दगड बाजूला करून तासाभरात वाहतूक सुरळीत केली. पोलीसांनी केलेल्या या मदतीमुळे पूरस्थितीत जवळपास २२ जणांचे प्राण वाचवणं शक्य झालं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading