पालकमंत्र्यांनी साजरी केली पोलिसां बरोबर दिवाळी

प्रत्येक सणाला पोलीस आपले कर्तव्य करत रस्त्यावर दक्ष असतात म्हणून आपण आनंदाने आणि सुखाने दिवाळी साजरी करू शकतो, वाहतूक पोलिसांच्या याच कर्तव्यभावनेची जाण राखून नगरविकास तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज ठाणे शहर वाहतूक पोलिसांसोबत दिवाळी साजरी करून त्यांचा सण खऱ्या अर्थाने गोड केला. ठाणे शहरातील वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत गजबजलेला चौक म्हणून ओळख असलेल्या तीन हात नाका येथील वाहतूक नियंत्रण कार्यालयात आज एक वेगळाच माहौल पहायला मिळाला. महिला आणि पुरुष वाहतूक पोलीस आणि अधिकारी सारे जण मोठ्या आनंदात आणि उत्साहात होते. कारण मंत्री एकनाथ शिंदे हे आज खास त्यांच्यासोबत दिवाळी साजरी करण्यासाठी येणार होते. एकनाथ शिंदे यांनी खास दिवाळीच्या निमित्ताने खास वाहतूक पोलिसांची भेट घेऊन त्यांना फराळ आणि मिठाईचे वाटप केले. वाहतूक पोलीस दिवसरात्र शहरातील वाहतुकीची व्यवस्था पाहण्यासाठी काम करतात. दिवाळीसह प्रत्येक सणाला आपल्या कुटूंबापासून दूर राहून कर्तव्य बजावतात त्यामुळे त्यांच्या कामाची दखल घेण्यासाठी आज पाडव्याच्या निमित्ताने आज इथे आलो असल्याचे शिंदे यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केलं. प्रत्येक सणाला पोलीस दक्ष राहून काम करतात कोरोना काळात देखील कर्तव्य निभावताना अनेक पोलिसांनी आपल्या प्राणांची आहुती देऊन काम केले. अनेकदा ऊन पाऊस याची तमा न बाळगता ते रस्त्यावर उभे असतात. तसेच अनेकदा यंत्रणा उशिरा पोहोचतात तेव्हा स्वतः तातपुरते रस्ते दुरुस्त करून वाहतूक नीट करण्याचे काम देखील वाहतुक पोलीस करत असल्याचे व्हिडीओ आपण पाहतो. अशावेळी त्यांना देखील आपल्या कुटूंबासोबत दिवाळी साजरी करावीशी वाटते पण कर्तव्यभावनेमुळे त्यांना काम करावे लागते. त्यांच्या याच कर्तव्यनिष्ठतेची जाण ठेवून आजच्या या दिवाळीचा पाडवा पोलीस बांधवांसोबत साजरा करण्याचा निर्णय घेतला असल्याचे शिंदे यांनी …… पोलिसांनी कधीही कोणतीही मागणी केली तर ती पूर्ण करण्यासाठी पालकमंत्री शिंदे हे कायमच तत्पर असतात. यावेळीही आम्ही त्यांच्याकडे शहरात सीसीटीव्ही लावण्याची केलेली मागणी देखील त्यांच्या पाठपुराव्यामुळे तत्परतेने पूर्ण झाली असल्याचे ठाण्याचे पोलीस आयुक्त जयजीत सिंग यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले. गृह विभागाने ठाणे पोलीस आयुक्तालयाचा प्रस्ताव स्वीकारून तत्काळ निधी मंजूर केल्याने ठाण्यात सीसीटीव्ही लावण्याचा मार्ग मोकळा झाला असल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले. पालकमंत्री शिंदे हे कायमच पोलिसांच्या पाठीशी ठामपणे उभे राहत असल्याची भावना ठाणे वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी बोलताना व्यक्त केली. कोरोना काळात पोलिसांना वैद्यकीय मदत मिळवून देणे असो, पावसाळ्यापूर्वी पोलिसांना रेनकोट उपलब्ध करून देणे असो, किंवा आता दिवाळीनिमित्त आम्हा पोलिसांना मिठाई उपलब्ध करून देणे असो शिंदे साहेब कायमच आमच्यासोबत असतात आज त्यांनी आमच्यासोबत दिवाळी साजरी करणं हे खरोखरच आमचा आनंद आणि उत्साह वाढवणारे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. यावेळी पालकमंत्री शिंदे यांनी पोलीस अधिकाऱ्यांना फराळ भरवत त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. तर पोलीस कर्मचाऱ्यांच्या सोबत बसून फराळ घेतला. त्यानंतर पोलीस कर्मचाऱ्यांचा उत्साह वाढवण्यासाठी त्यांच्या सोबत फटाकेही फोडले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading