पाकिस्तानचे दोन तुकडे करण्याचा सार्थ अभिमान – शांताराम शिंदे

पाकिस्तानचे दोन तुकडे करून बांगलादेशाची निर्मिती करण्याच्या घटनेला १६ डिसेंबर रोजी ५० वर्ष झाली. या अदुतीय विजयातील  एक शिपाई असल्याचा सार्थ अभिमान असून त्या युद्धातील आठवणी जागृत झाल्या की उर भरून येते, असे उद्गार भारत पाकिस्तानमध्ये झालेल्या युद्धात प्रत्यक्ष सक्रिय सहभाग घेतलेले माजी सैनिक शांताराम शिंदे यांनी सत्काराला उत्तर देताना काढले. काल पाकिस्तानवरील विजयाचा सुवर्ण मोहत्सवी सोहळा होता. पनवेल येथे कोरोनाच्या नियमाचे पालन करीत सह्याद्री प्रतिष्ठान, हिंदुस्तान, पनवेल विभागाने  १९७१ च्या बांगलादेश युध्दात पराक्रम गाजविणाऱ्या शूरवीरांना वंदना आणि शहिदांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शौर्य तुला वंदितो या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी युद्धात प्रत्यक्ष सहभाग घेऊन पाकिस्तानी सैन्यांना धूळ चारणारे शौर्य सेवा पदक विजेते ८१ वर्षीय शांताराम विश्राम शिंदे  यांचा स्मृतीचिन्ह, छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा, शाल, श्रीफळ देऊन गौरव करण्यात आला. त्यावेळी बोलताना शांताराम शिंदे यांनी युद्धातील आठवणी सांगताच उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात आणि वंदे मातरम् च्या घोषणा देऊन जवानांना मानवंदना दिली. युद्धात कशाप्रकरे अँटी टँकर बॉम्ब, माईन लावण्यात आले, रस्त्यावर माईन लावण्यात आले, हेलिपॅड बनविण्यात आले आणि रात्रीचे रस्ते तसेच ब्रीज बनवून ते नष्ट ही करण्यात येत होते,  बर्फ गरम करून पाणी प्यावे लागत असे, आदी प्रत्यक्ष रणभूमीवर जवानांनी केलेल्या शौर्याचे अनुभव ऐकून सगळ्यांच्या अंगावर रोमांच उमटले. काश्मीरमधील बर्फात गाढले गेलेले मराठा बटालियनचे १५ जवानांची बॉडी कशाप्रकारे बाहेर काढण्यात आल्या, हे  शिंदे यांनी सांगताच सभागृह शांत झाले. यावेळी माजी सैनिक प्रवीण पाटील, माजी सैनिक भरत कर्णेकर, समीर दुर्देकर, किसन बोराटे यांनी कारगिल तसेच गेल्या वीस वर्षात केलेल्या ऑपरेशनची माहिती दिली. त्यांचा सह्याद्री प्रतिष्ठानतर्फे सन्मान करण्यात आला. त्याचबरोबर या ऐतिहासिक कार्यक्रमाचे साक्षीदार बनलेल्या नरवीर तानाजी मालुसरे यांच्या वंशज डॉ. शीतल मालुसरे आणि स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेतील अभिनेते रमेश रोकडे, देवेंद्र सरदार, निलेश बढे यांचाही सत्कार करण्यात आले. त्यांनी नव्या पिढीला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जाज्वल इतिहास अभ्यासून गडकिल्ल्यांच्या संरक्षणासाठी काम करणाऱ्या सह्याद्री प्रतिष्ठानच्या मावळ्यांच्या कामाचे कौतुक केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष पद भूषिणारे रायगड भूषण शिवशाहीर वैभव घरत यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि देशभक्ती पर पोवाडे गाऊन आठवणी जागवल्या.लहान मुलांनी  आपल्या नृत्य आविष्कारातून भारत मातेला आणि शूरवीर जवानांना वंदन करीत शहिदांना श्रद्धांजली वाहिली.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading