परीक्षेतील मार्क म्हणजेच बुद्धिमत्ता असे नसून सर्व कलेतील कौशल्य ही बुद्धिमत्ताच आहे – आशुतोष शिर्के

बुद्धिमत्ता ठरवण्याचा निकष हा फक्त परीक्षेतील मार्क नसून संगीत, चित्रकला, शिल्पकला, नृत्य, फोटोग्राफी, सुसंवाद साधण्याची कला, निसर्गातील प्राणी, पक्षी, झाडे, हवामान यांच्या निरीक्षणातून त्यांना समजून घेण्याची कला, विविध भाषा शिकून आत्मसात करण्याचे कौशल्य या सर्व गोष्टी म्हणजे ही बुद्धिमत्ता आहे आणि हे हॉवर्ड गार्डनर या विचारवंताने त्याच्या अनेक वर्षांच्या संशोधनानंतर प्रसिद्ध केलेल्या प्रबंधात सांगितले आहे असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते आणि यूथ मेंटॉर आशुतोष शिर्के यांनी केले. समता विचार प्रसारक संस्था आयोजित येऊर येथील ५ दिवसांच्या निवासी समता संस्कार शिबिराच्या समारोप कार्यक्रमात शिबिरार्थीना मार्गदर्शन करताना शिर्के बोलत होते. मार्क कमी जास्त मिळाले तरीही निराश व्हायचे नाही. ही असमानता नसून भिन्नता आहे, तुमच्यात भिन्न प्रकारची बुद्धिमत्ता आहे. ती बुद्धिमत्ता समजून घ्या आणि तिला अवकाश मिळेल असे अभ्यासाचे क्षेत्र निवडा. या शिबिरातून तुम्हाला आत्मविश्वास मिळाला आहे. त्याचा उपयोग करुन योग्य क्षेत्र निवडून मेहनत करा, यश तुमच्या हातात आहे असं आशुतोष शिर्के यांनी सांगितलं. समता विचार प्रसारक संस्था दरवर्षी ठाण्यातील विविध वस्तीतील १० वी ला बसलेल्या आणि त्यापुढील वयोगटातील एकलव्य विद्यार्थ्यांसाठी समता संस्कार शिबिराचे आयोजन करते. येऊर येथील निसर्गरम्य वातावरणात अनंताश्रम येथे संपन्न झालेल्या या शिबिरात कळवा, सावरकर नगर, येऊर, मनपाडा, किसन नगर, बाळकुम आणि भांडुपहूनही २६ मुली आणि २२ मुले सहभागी झाली होती. या शिबिरात विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासाबरोबरच त्यांची सामाजिक जाणीव वाढवण्याच्या दृष्टीने खेळ, कार्यशाळा, व्याख्याने यासारख्या माध्यमातून त्यांना मार्गदर्शन केलं जातं. राजेंद्र बहाळकर यांनी माध्यमांचा प्रभाव, आपला दृष्टिकोन या बद्दल खेळांतून मुलांना छान समजावलं. संजय मंगला गोपाळ यांनी करियर कसं निवडावं या बद्दल मार्गदर्शन केलं, ऋतेश पंडितराव आणि त्यांचे सहकारी अभय घाडगे आणि डिंपी शाह यानी कार्यशाळेच्या माध्यमातुन मुलांना स्वयंशिस्तीचं महत्व पटवून दिलं. प्रशांत केळकर यानी शरीर विज्ञानाची माहिती देताना लैंगिक अवयव आणि लैंगिकता यावर अतिशय प्रभावी मार्गदर्शन केले. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वंदना शिंदे यांनी मुलांना अंधश्रद्धेचा फोलपणा प्रयोगाद्वारे दाखवला. आसावरी जोशी यांनी मुलांसाठी टाकाऊतून टिकावू अशी कार्यशाळा घेतली. संतोष पाठारे यांनी शॅार्ट फिल्म्स दाखवून त्यावर चर्चा घडवून आणली. प्रशांत केळकर आणि पंकज गुरव यांनी मुलांना नाटकाची माहिती देऊन त्यांच्या नाटिका बसवल्या. फक्त मुले नाही तर मुलीही मुलांची छेडछाड करतात या विषयावर तसेच जातिभेद, अंधश्रद्धा आणि नेतृत्व या विषयावर मुलांनी नाटिका बसवल्या आणि त्या समारोपाच्या कार्यक्रमात सादर केल्या. ही गटचर्चेच्या माध्यमातून मुले त्यांना भिडणाऱ्या जात-धर्म- लिंगभेद तसेच आरक्षणाचा प्रश्न, आपला परिसर आणि पर्यावरणासारख्या अनेक विषयांवर मनमोकळी व्यक्त झाली.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading