पदपथावरील अतिक्रमण कारवाईत जप्त केलेल्या फळ – भाजीपाल्याचे सेवाभावी संस्थांना वाटप

ठाणे शहरातील पदपथ नागरिकांना चालण्यासाठी मोकळे ठेवण्याच्या दृष्टीकोनातून महापालिकेच्या अतिक्रमण विभागातर्फे दैनंदिन कारवाईची मोहिम सुरू आहे. ठाणे स्टेशन परिसर अतिक्रमणमुक्त असावा यासाठी कडक मोहिम हाती घेण्यात आली आहे. परंतु गेले काही दिवस नेताजी सुभाषचंद्र पथ ते कोपीनेश्वर मंदिर येथील मुख्य रस्त्यावर असलेल्या भाजी मार्केट पथावर भाजी आणि फळे विक्रेत्यांची संख्या वाढत असल्याचे निदर्शनास आले. हे अतिक्रमण तातडीनं हटवण्यासाठी कारवाई करुन यामध्ये जप्त करण्यात आलेली फळे आणि भाजीपाला आदीचे वाटप सेवाभावी संस्थांना करण्यात आले. गेला आठवडाभर सकाळी 6.30 वाजल्यापासून दैनंदिन कारवाईची मोहिम सुरू आहे. सुभाष पथ येथील मुख्य रस्त्यावर लागत असलेल्या अनधिकृत भाजी मार्केटवर कारवाई करण्यात आली. या कारवाई दरम्यान भाजीपाला, फळे जप्त करण्यात आली असून सर्व भाजीपाला तसेच फळे सेवाभावी संस्थांना तसेच छत्रपती शिवाजी हॉस्पिटल येथील शिव प्रेरणा मंडळ, वर्तक नगर येथील दिव्यप्रभा महिला अनाथालय, माँ निकेतन महिला कामगार संस्था, नौपाडा येथील वुमेन्स वेल्फेअर फाऊंडेशन, नौपाडा कोपरी प्रभागतील बेघर संस्था, येउर येथील श्री सदगुरू सेवा मंदिर ट्रस्ट यांस देण्यात येत आहे.
या भाजीमार्केटमुळे येथून जाणाऱ्या परिवहनच्या बसेसनाही अडथळा निर्माण होत होता, या भाजीमार्केटवर करण्यात आलेल्या कारवाईमुळे येथे होणारी वाहतूक कोंडी सुटण्यास मदत झाली आहे. सिद्धिविनायक गणपती मंदिर ते टॉवर चौक, गणपती मंदिर ते विठ्ठल मंदिर, पोलिस चौकी नं.२ समोरील रस्ता तसेच A-१ फर्निचर ते अग्निशामक पर्यंत रस्त्यावरील फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात आली. ठाणे स्टेशन आणि परिसरालगत असलेले सर्व रस्ते आणि पदपथ हे वाहतूकीसाठी कायमस्वरुपी मोकळे असणे गरजेचे आहे. या दृष्टीकोनातून वारंवार जनजागृती करुन देखील अतिक्रमण होत आहे. ही मोहिम महापालिकेबरोबरच पोलीस विभागामार्फत सातत्याने सुरू आहे, तरी या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे अतिक्रमण करुन नागरिकांना वाहतूकीस अडथळा निर्माण होईल असे कृत्य करु नये तसेच रस्ता वा फूटपाथवर उभ्या राहत असलेल्या फेरीवाल्यांकडून खरेदी करु नये असे आवाहन आयुक्त अभिजीत बांगर यांनी केले आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading