पंडीत राम मराठे स्मृती पुरस्कार हरिप्रसाद चौरसिया यांना तर अनंत जोशी यांना पंडीत राम मराठे युवा पुरस्कार जाहीर झाला आहे. महापौर नरेश म्हस्के यांनी ही घोषणा केली आहे. पंडीत राम मराठे स्मृती समारोह ६ डिसेंबर पासून सुरू होत असून पहिल्याच दिवशी हे पुरस्कार वितरित केले जाणार आहेत. वैशिष्ट्यपूर्ण बासरीच्या मधुर स्वरानं संपूर्ण जगाचं लक्ष वेधणा-या पंडीत हरिप्रसाद चौरसिया यांना राम मराठे राज्यस्तरीय तर हार्मोनियम वाद्यासाठी अनंत जोशी यांना पंडीत राम मराठे स्मृती युवा पुरस्कारानं गौरवलं जाणार असल्याचं महापौर नरेश म्हस्के यांनी सांगितलं. राज्याचे मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते हे पुरस्कार दिले जाणार आहेत. पंडीत हरिप्रसाद चौरसिया यांचं भारतीय शास्त्रीय संगीतामध्ये अतुलनीय योगदान आहे. भारतीय बासरीला स्वतंत्र ओळख मिळवून देण्यात त्यांचं मोठं योगदान आहे. त्यांच्या या सांगितिक योगदानाबद्दल त्यांना हा पुरस्कार देऊन गौरवलं जाणार आहे. हार्मोनियम या वाद्यावर अत्यंत कठोर रियाजानं अनंत जोशी यांनी आपलं प्रभुत्व सिध्द केलं आहे. कल्चरल मिनिस्ट्री ऑफ इंडियातर्फे हार्मोनियम या वाद्यासाठी ठेवलेल्या पहिल्या फेलोशिपचे ते मानकरी ठरले आहेत. राज्य नाट्य स्पर्धेत सर्वोत्कृष्ट संगीतकार या किताबानं त्यांना सन्मानित करण्यात आलं आहे. त्यांच्या या कार्याबद्दल त्यांना पंडीत राम मराठे स्मृती पुरस्कारानं सन्मानित केलं जाणार आहे.