न्यूमोमोकल कॉन्झुगेट व्हॅक्सीनचा महापौरांच्या हस्ते शुभारंभ

न्यूमोनिया या आजारापासून लहान बालकांची सुरक्षा करण्याकरिता न्यूमोमोकल कॉन्झुगेट व्हॅक्सीनचा शुभारंभ आज सर्वत्र करण्यात आला. ठाणे महापालिकेच्या सर्व आरोग्य केंद्रातही आजपासून ही लस उपलब्ध करण्यात आली असून त्याचे उद्घाटन आज महापौर नरेश म्हस्के यांच्या हस्ते करण्यात आले. न्यूमोनिया या आजारापासून होणारे बालकांचे मृत्यू रोखण्याकरिता ही लस अत्यंत उपयोगी असून ही लस सर्व बालकांना देण्यात यावी तसेच याबाबतची जनजागृती संपूर्ण ठाणे शहरात करावी अशा सूचना महापौरांनी यावेळी संबंधित विभागाला दिल्या. न्यूमोनिया हा फुप्फुसांना होणारा संसर्ग असून त्यामुळे बालकांना श्वासोच्छवासला त्रास होणे, धाप लागणे, ताप, खोकला येणे अशी लक्षणे दिसून येतात. जर हा आजार गंभीर स्वरुपाचा असेल तर मृत्यू देखील ओढवतो. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात मृत्यूचे प्रमाण फार कमी होते. परंतु या आजारापासून लहान बालकांना सुरक्षित ठेवण्यासाठी नियमित लसीकरणातंर्गत न्यूमोनियाचे लसीकरण करणे गरजेचे आहे. एक वर्षाच्या आतील बालकांना म्हणजेच जन्मल्यापासून 6 आठवड्यांनी पहिला डोस, 14 आठवड्यांनी दुसरा डोस आणि 9 महिन्यानंतर तिसरा डोस दिला जाणार आहे. न्यूमोकोकल कॉन्जुगेट व्हॅक्सीन हे महापालिकेच्या सर्व आरोग्यकेंद्रात विनामूल्य दिलं जाणार आहे. तर खाजगी रुगणालयामध्ये या लसीची किंमत चार हजार रुपये इतकी आहे. ठाणे शहरातील सर्व नागरिकांनी आपल्या एक वर्षापर्यंच्या बालकांना हा डोस द्यावा असे आवाहन महापौरांनी केले आहे. तसेच या लसीबद्दलची माहिती सर्व नागरिकांपर्यत पोहचावी यासाठी जनजागृती करण्याबाबतच्या सूचनाही आरोग्य विभागाला दिल्या.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading