नौपाड्यात आयोजित केलेल्या भोंडल्याला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

ऐलमा पैलमा गणेश देवा, माझा खेळ मांडून दे… एक लिंबू झेलू बाई दोन लिंबू… अक्कण माती, चिक्कण माती अशा पारंपरिक गीतांच्या सुरात भोंडल्याचा कार्यक्रम उत्तरोत्तर रंगत गेला. भाजपा आणि विश्वास सामाजिक संस्थेने पारंपरिक मराठी संस्कृतीची नव्या पिढीला ओळख होण्याबरोबरच संस्कृती वृ्द्धींगत करण्यासाठी नौपाड्यात आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघुले, वृषाली वाघुले यांनी नौपाड्यातील उमा नीळकंठ व्यायामशाळेच्या प्रांगणात महाभोंडल्याचे आयोजन केले होते. गेल्या वर्षी कोरोना निर्बंधांमुळे महाभोंडला रद्द करण्यात आला होता. भाजपा आणि विश्वास सामाजिक संस्थेतर्फे यंदा १९ व्या वर्षी उत्साहात भोंडला आयोजित करण्यात आला होता. नऊ वारी पैठणी साडी, नथ, पारंपरिक दागिने अशी वेशभूषा करीत नौपाड्यातील महिलांनी भोंडल्याची पारंपरिक गाणी म्हणत फेर धरला. महिलांबरोबरच छोट्या मुली आणी तरुणींमध्ये उत्साह होता. अन्, पुढील दोन तासांत नवरात्रीतील मराठी संस्कृतीची झलक पाहावयास मिळाली. महाभोंडल्यात वयोगटानुसार चार गटात सर्वोत्कृष्ट ठरलेल्या मुली-महिलांना बक्षीसे देण्यात आली. तीन वर्षांवरील गटात अनया चोरगे, रोमा माने, इशानी कदम-पाटील, देवश्री दळवी यांना, ७ ते १५ वयोगटात प्रांजली दळवी, आर्या चोरगे, आर्या भानुशाली, देवाशी पवार, अनुश्री कडव यांना, १६ ते २५ वयोगटात नारायणी गांगुर्डे, श्रावणी कवठणकर, दिव्यानी कवठणकर, सृष्टी तेली यांना, तर २५ पुढील वयोगटात वर्षा सावंत, भाग्यश्री पानसरे, सायली कोळी, हर्षदा तळपे यांना बक्षीसे देण्यात आली. १५ वर्षांखालील गटातील मुलींना शाळेचे दप्तर, तर १६ वर्षांवरील दोन गटातील प्रथम क्रमांकाच्या विजेती तरुणी आणि महिलेला सोन्याची नथ, पैठणी, गिफ्ट व्हाऊचर देण्यात आले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading