नौपाडा पोलीस स्टेशनमध्ये पुन्हा आढळला विषारी साप

नौपाडा पोलीस स्टेशनमध्ये काल रात्री पुन्हा विषारी साप आढळून आला. रात्री १२ च्या सुमारास नौपाडा पोलीस स्टेशनच्या मागच्या झुडपात पोलीस हवालदार सुनील पवार यांनी सापाने उंदीर तोंडात पकडल्याचे पाहिले, त्यांनी वागळे पोलीस स्टेशनचे सर्पमित्र ज्ञानेश्वर शिरसाट यांना पाचारण केले. शिरसाट यांनी स्वतः चा जीव धोक्यात घालून अत्यंत विषारी अश्या साडेचार फूट घोणस प्रजातीच्या सापाला पकडले. घोणसला इंग्रजी मध्ये रस्सल वायपर म्हणतात. हा विषारी प्रवर्गात मोडणारा सर्प आहे.त्याच्या अंगावर साखळी प्रमाणे रुद्राक्षाच्या आकाराएवढे ठिपके असतात, हा साप निशाचर असल्याने शक्यतो रात्रीच आपले भक्ष्य शोधायला बाहेर पडतो. हा साप चिडल्यावर स्वतःचा अंगाला वेटोळे करून बसतो आणि कुकरच्या शिट्टी सारखा आवाज काढतो. हा साप अत्यंत विषारी असून मास सडवून टाकतो आणि चावलेला भाग निकामी होऊ शकतो. प्राणीमित्र शिरसाट यांनी पुन्हा या सापाला जीवदान दिले. गेल्या १० दिवसातली ही दुसरी घटना आहे.

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading