नाले सफाईच्या कामात कोणतीही हयगय नको – महापालिका आयुक्त

नाले सफाईच्या कामात कोणतीही हयगय नको. सगळे नाले ९० टक्के नव्हे तर १०० टक्के साफ झाले पाहिजेत, हेच डोक्यात ठेवून काम करावे, अशा स्पष्ट सूचना महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी घनकचरा व्यवस्थापन विभागास दिल्या आहेत. आयुक्त बांगर यांनी गुरूवारी नाले सफाईच्या कामाची पाहणी केली. ज्ञानसाधना महाविद्यालय, किसन नगर, इंदिरा नगर – साठे नगर, कापूरबावडी, पातलीपाडा येथील नाले सफाईचा आढावा घेतला.ज्ञानसाधना महाविद्यालयाच्या पाठी रेल्वे मार्गालगत असलेल्या नाल्यातून गाळ उपसण्याचे काम पोलकेन मशीनच्या मदतीने सुरू आहे. रेल्वे मार्गाखाली असलेल्या नाल्यात मशीन जाणे शक्य नाही. तेथे मनुष्यबळाचा वापर करून गाळ साफ केला जाईल, याची दक्षता घ्यावी. कल्व्हर्ट खालील गाळ काढला नाही, तर त्याच्या अलिकडच्या भागातील नाले सफाईची उपयुक्तता शून्य राहील, असेही आयुक्त श्री. बांगर यांनी नमूद केले.नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर कचरा असून त्यांची सफाई हे मोठे आव्हान आहे. पावसाळ्यापूर्वी सर्व नाले साफ होतील, तसेच वेळोवेळी त्यांची सफाई केली जाईल. तसेच, अतिवृष्टीच्या काळात अधिक लक्ष ठेवले जाईल याची दक्षता घेण्याचे निर्देश आयुक्तांनी दिलेकिसन नगर येथील पाहणी दरम्यान नाल्यातील झुडपे हटविण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या. या झुडपांमध्ये कचरा अडकून तो नाल्याचा प्रवाह बाधित करतो. त्यामुळे जसा नाल्यातील गाळ काढला जातो आहे, तसेच ही झुडपे आणि इतर अडथळे दूर करण्यास आयुक्त श्री. बांगर यांनी सांगितले.इंदिरा नगर, साठे नगर या भागातील नाले सफाईची पाहणी केल्यावर आयुक्तांनी नाल्यावरील जाळ्यांबद्दल अधिकाऱ्यांशी चर्चा केली. नाल्याच्या दोन्ही बाजूंना सहा फुटांपर्यंत जाळ्या बसवल्या तर नागरिकांकडून कचरा टाकण्याचे प्रमाण कमी होईल. तर काही ठिकाणी नाल्या शेजारी दुमजली बांधकामे आहेत. अशा ठिकाणी नाल्यांवर कमानीच्या आकाराच्या जाळ्या बसवता येतील का याची पाहणी करून प्रायोगिक तत्वावर एका नाल्यावर काम सुरू करण्यास आयुक्त श्री. बांगर यांनी सांगितले. या जाळ्या बसवताना त्यांची सफाई करणे सुलभ होईल अशी रचना ठेवावी, असेही आयुक्तांनी स्पष्ट केले. कापूरबावडी आणि पातली पाडा येथे पाहणी दरम्यान वीज वाहिन्यांबद्दल विशेष काळजी घेण्याची सूचना आयुक्तांनी केली. कामगारांच्या सुरक्षेची पूर्ण काळजी घेवून काम व्हावे, असे आयुक्त श्री. बांगर म्हणाले. जेथे वीज वाहिन्या आहेत तिथे महावितरणच्या अधिकारांच्या उपस्थितीतच नालेसफाईचे काम करावे, असेही आयुक्तांनी सांगितले. तसेच, रस्त्यावर काढून ठेवलेला गाळ जास्तीत जास्त ४८ तासांच्या आत उचलला जाईल याची खबरदारी घेण्याची सूचना दिली.मान्सून पूर्व आढावा घेण्यासाठी मध्य रेल्वे सोबत बैठक आयोजित करण्यात येणार आहे. त्यात, मुलुंड ते दिवा भागातील रेल्वे मार्गाखालील नाले सफाईचा कालबध्द कार्यक्रम, तसेच, ठाणे रेल्वे स्टेशन परिसरातील पाणी साठण्याच्या जागा यांच्यावर उपाय योजनांची आखणी केली जाईल, अशी माहिती आयुक्त श्री. बांगर यांनी दिली.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading