नागपंचमीचा सण सर्वत्र साजरा

नागपंचमीचा सण आज साजरा झाला मात्र पर्यावरणवाद्यांच्या रेट्यामुळे नागपंचमी असल्याचं वातावरण अलिकडे कुठेही दिसतनाही. दिनदर्शिकेवरूनच नागपंचमी असल्याचं समजतं. आता नागपंचमीचा सण अगदी घरगुती पातळीवर साजरा होऊ लागला आहे. पर्यावरणवाद्यांच्या आवाहनामुळं नागोबाला दूध पाजतानाचं चित्र आजकाल फारसं पहायला मिळत नाही. काही ठिकाणी नागपंचमीच्या दिवशी कापणं, चिरणं, तळणं अशा गोष्टी वर्ज्य मानल्या जातात. मात्र आजकाल हेही दुर्मिळ होत चाललं असलं तरी काही घरात या प्रथा आजही पाळल्या जातात. ठाण्यामध्ये कौपिनेश्वर मंदिर परिसरात अनेकजण नागोबाला घेऊन बसलेले दिसत असत. पण अलिकडे मात्र हे चित्र दुर्मिळ झालं आहे. नागोबा फारसा बाहेर न दिसल्यामुळं गृहिणींना घरातल्या घरातच नागोबाच्या चित्राचं किंवा मूर्तीचं पूजन करावं लागतं. नागपंचमी या सणामागची पौराणिक कथा म्हणजे यमुना नदीच्या डोहात कालिया नावाचा महाविषारी दुष्ट साप होता. त्याच्या साध्या फुत्कारानं सुध्दा सर्वकाही भस्मसात होई. श्रीकृष्णानं या कालिया नागाचं दमन केलं आणि गोकुळातील लोकांचे रक्षण केलं तो दिवस म्हणजे श्रावण शुक्ल पंचमी. तेव्हापासून लोक नागाची पूजा करून नागाला लाह्या, दूध वाहतात. नागदेवतेनं प्रसन्न होऊन आपल्याला त्रास देऊ नये ही यामागची इच्छा असते. अंगणात किंवा पाटावर चंदनानं पाच फण्यांचा नाग काढून पूजा केली जाते. नागपंचमीच्या आदल्या दिवशी स्त्रिया हातावर मेंदी काढतात आणि नविन बांगड्या भरतात अशी प्रथा आहे. ठाण्यात लुईसवाडीमध्ये एकमेव असं नागाचं मंदिर आहे, या मंदिरातही पूजेसाठी गर्दी झाल्याचं चित्र दिसत होतं. ठाण्यातील वाघबीळ इथेही नागाचे एक स्वयंभू मंदिर आहे. या मंदिरात केलेला नवस पूर्ण होतो अशी या भागातील नागरिकांची श्रध्दा आहे. नागपंचमीच्या दिवशी अनेक नाग या ठिकाणी दिसतात. हे मंदिर स्वयंभू असून नागपंचमीच्या दिवशी अनेक नाग प्रकट होतात, पण कोणालाही काही करत नाहीत अशी श्रध्दा आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading