नवीन फिडरमुळे ठाणेकरांना होणार अखंडित वीजपुरवठा होण्याचा मार्ग मोकळा

नवीन फिडरमुळे ठाणेकरांना होणार अखंडित वीजपुरवठा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. महावितरण आणि ठाणे महापालिकेचे नगर अभियंता यांच्यातील वादामुळे गेले काही महिने वीज पुरवठा खंडीत होण्याचे प्रकार घडत होते. आमदार संजय केळकर यांच्या शिष्टाईमुळे नवीन फिडर टाकण्याचे काम लवकरच सुरू होऊन ठाणेकरांना अखंडित वीज पुरवठा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ठाणे पूर्वेकडील अष्टविनायक चौकात असलेल्या विद्युत फिडरमध्ये बिघाड होत असल्याने गेल्या काही महिन्यापासून ठाण्यात वीजेचा लपंडाव सुरू आहे. या एकाच फिडरवरून संपुर्ण शहरात वीज पुरवठा सुरु आहे. दुसऱ्या ठिकाणी पर्यायी सुविधा उपलब्ध नसल्याने ही समस्या उद्भवली होती. महावितरणने अष्टविनायक चौकात खोदकाम करण्यास परवानगी मागितली होती. परंतु महापालिकेच्या नगर अभियंत्यांनी परवानगी नाकारल्याने अखंडीत वीज पुरवठा करता येत नसल्याचे महावितरणने स्पष्ट केले होते. सहा महिन्यांपासून ही दफ्तर दिरंगाई सुरु होती. आता पावसाळा आल्याने काम करता येणार नसल्याचा पवित्रा महावितरणने घेतला होता. ठाणे महापालिका आणि महावितरण यांच्यातील वादामुळे लाखो ठाणेकरांना वेठीस धरले गेले होते. अखेर आ. संजय केळकर यांनी आयुक्तांच्या दालनात महावितरण आणि महापालिका अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक बोलावुन ही समस्या तडीस नेली. खोदकामास महापालिकेची परवानगी मिळाली असून महावितरणने जे पैसे भरायचे आहेत ते भरून लवकरात लवकर काम सुरू करण्याचा निर्णय झाला आहे. त्यामुळे पुढच्याच आठवड्यात अष्टविनायक चौकात फिडरचे काम करण्यासाठी खोदकाम सुरु होणार असून ठाणेकरांना अखंडीत वीज पुरवठा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे, अशी माहिती आ. केळकर यांनी दिली.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading