नवाब मलिकांचा बार फुसका – भाजपावर आरोप करणारे तोंडघशी

राज्याचे मंत्री नवाब मलिक यांनी किरण गोसावी हा भाजपा आमदाराच्या पत्नीच्या कंपनीत संचालक असल्याबद्दल केलेल्या आरोपाचा बार फुसका ठरला आहे. आमदार निरंजन डावखरे यांनी आज `मायक्रोबायॉलॉजिस्ट’ असलेल्या किरण गोसावींना आज पत्रकार परिषदेत समोर आणले. अन्, नवाब मलिकांसह सोशल मिडियावर भाजपाला आरोपींच्या पिंजऱ्यात बसविणारे तथाकथित समाजमाध्यमी तोंडघशी पडले. निरंजन डावखरे यांच्या पत्नी निलिमा डावखरे आणि किरण गोसावी एका कंपनीत संचालक असल्याचे स्नॅप शॉट्स काल समाजमाध्यमांवर प्रसारीत झाले होते. मंत्री नवाब मलिकांच्या पत्रकार परिषदेनंतर दहा-पंधरा मिनिटांनंतर स्नॅप शॉट्स व्हायरल झाले. त्यामुळे भाजपाविरोधात ब्रह्रास्त्र सापडल्याच्या आनंदात आणि आर्यन खानच्या माध्यमातून स्वत:चा पर्सनल अजेंडा राबविण्याचा प्रयत्न करणारे तोंडघशी पडले आहेत, अशी टीका डावखरे यांनी केली. या प्रकाराने `खोदा पहाड निकला चुहा’ अशी स्थिती निर्माण झाली. मित्र परिवाराने आणलेला गांजा पिऊन आणि खोटी माहिती देऊन कोणीही दिशाभूल करू नये, असा टोला आमदार डावखरे यांनी मारला. `ट्र्यू पॅथलॅब’चे संचालक असलेल्या किरण प्रकाश गोसावी यांचे नामसाधर्म्य आढळल्यानंतर टणाटणा उड्या मारून बदनामी करण्याचा डाव शिजला, असा आरोप डावखरे यांनी केला. केवळ ४००-४५० रुपये भरून सविस्तर माहिती घेण्याऐवजी शहानिशा न करता हेतुपुरस्सर आरोप करण्यात आले, असे डावखरे यांनी सांगितले. नवाब मलिक यांनी दीड महिन्यानंतर होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात गौप्यस्फोट करण्याचे जाहीर केले. मात्र, हिवाळी अधिवेशनात राज्यातील शेतकरी, पूर परिस्थिती, अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीबाबतची चर्चा टाळण्याबरोबरच विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप आमदार डावखरे यांनी केला. गेल्या ७ ऑक्टोबर रोजी पुणे पोलिसांकडून माझ्याशी संपर्क साधण्यात आला. त्यांना मी माझी कागदपत्रे आणि पासपोर्ट दाखविला. केवळ नावात सारखेपणा असल्यामुळे मला नाहक त्रास झाला, असे ट्र्यू पॅथलॅबचे संचालक किरण गोसावी यांनी सांगितले. समाजमाध्यमांमध्ये `स्नॅप शॉट्स’ व्हायरल करून बदनामी केल्याप्रकरणी सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात येईल. तसेच दोषींविरोधात कारवाई करण्याची मागणी करण्यात येईल, अशी माहिती निरंजन डावखरे यांनी दिली.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading