धोकादायक वाहनांमधून होत असलेली कचरा वाहतूक तातडीने थांबवून संबंधित ठेकेदारांवर कारवाई करावी – राहुल पिंगळे

धोकादायक असलेल्या सर्वच वाहनांमधून होत असलेली कचरा वाहतूक तातडीने थांबवून संबंधित ठेकेदारांवर कारवाई करावी अशी मागणी ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष राहुल पिंगळे यांनी आयुक्त अभिजीत बांगर यांच्याकडे केली आहे. मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणे या उपक्रमांतर्गत शहरातील स्वच्छतेकडे विशेष लक्ष दिले जात आहे. शहरातील कचरा अधिक जलद आणि सफाईदारपणे उचलण्यासाठी नव्याने स्वच्छता यंत्रे महानगरपालिकेच्या वाहन ताफ्यात दाखल झाली आहेत. त्यातच दुसरीकडे ठाणे शहरात कचरा उचलण्यासाठी अँथोनी वेस्ट हँडलिंग सेल प्रायव्हेट लिमिटेड नावाने रजिस्टर असलेली खराब अवस्थेतील वाहने रस्त्यावरून धावताना दिसून येत आहेत. या वाहनांचे दरवाजे तुटलेले आणि गंजलेले आहेत. ठिकठिकाणी दोरीने बांधलेले आहेत. वाहनातील आसन व्यवस्था योग्य स्थितीत नाही,काही गाड्या गळत असल्याने छतावर प्लास्टिक बांधलेले आहे,वाहनांना जागोजागी गंज चढलेला आहे त्यामुळे अशी वाहने भर रस्त्यात अचानक बंद पडल्याने वाहतूक कोंडी तसेच कचऱ्याच्या दुर्गंधीचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. संबंधित ठेकेदाराकडून वाहनांच्या दुरुस्ती आणि देखभालीकडे लक्ष न दिल्याने वाहनांची दुरावस्था झालेली आहे. तसेच यातील काही वाहनांना परवानगीशिवाय बॉडी मध्ये बदल करणे, विनापरवानगी जाहिरात करणे, फिटनेस सर्टिफिकेट जवळ न बाळगणे यासह इतर विविध कारणांसाठी परिवहन विभागाकडून दंड देखील करण्यात आलेला आहे. कचरा वाहतूक करताना सुस्थितीत असलेल्या वाहनातून सुरक्षित रित्या वाहतूक करणे अपेक्षित असताना घनकचरा विभागाच्या अधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्यानेच अशी गंजलेली नादुरुस्त खराब अवस्थेतील वाहने कचरा उचलण्यासाठी रस्त्यावर धावत आहेत त्यामुळे या वाहनांवर काम करणारे कर्मचारी तसेच नागरिक यांच्या जीवितासह इतर वाहनांना देखील धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे इतक्या त्रुटी असताना वाहनास फिटनेस सर्टिफिकेट दिलेच कसे गेले या बाबत परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन अशा धोकादायक सर्वच वाहनांची तातडीने तपासणी मोहीम हाती घेऊन कारवाई करण्याची मागणी करणार असून अशा धोकादायक असलेल्या सर्वच वाहनांमधून होत असलेली कचरा वाहतूक तातडीने थांबवून संबंधित ठेकेदारांवर कारवाई करावी अशी मागणी ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष राहुल पिंगळे यांनी आयुक्त अभिजीत बांगर यांच्याकडे ई मेल द्वारे केली आहे.

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading