धुन्धुरमास कार्यक्रमाला प्रचंड प्रतिसाद – ठराविक सण ठराविक ऋतूत येण्यासाठी  पंचांगात चांद्र- सौर पद्धतीचा मेळ

हिन्दू जागृती न्यास संचालित श्री घंटाळी देवी मंदिर व्यवस्थापन समितीतर्फे मंदिरात रविवार सकाळी ७ ते ९ यावेळेत ‘ धुन्धुरमास विशेष न्याहरी ‘ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या प्रारंभी पंचांगकर्ते , खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी ‘धुन्धुरमास ‘ या विषयाची वैज्ञानिक माहिती दिली आणि आनंदी दीर्घांयुष्य प्राप्तीचे रहस्य  विशद केले. त्यानंतर सर्वांना मुगाची गरमागरम खिचडी, साजूक तूप, ओलेखोबरे, लेकुरवाळी ( वांगे, पावटे, शेवग्याच्या शेंगा ) भाजी, तीळ लावलेली बाजरीची भाकरी, लोणी, वांग्याचे खानदेशी भरीत , मिरचीचा खर्डा अशी धुन्धुरमास न्याहरी देण्यात आली. या कार्यक्रमाला सकाळची वेळ असूनही लोकांनी प्रचंड प्रतिसाद दिला. यावेळी धुन्धुरमााचे महत्त्व सांगतांना दा. कृ. सोमण म्हणाले की, “ ्यावेळी सूर्य धनू राशीत असतो, त्या काळाला. ‘ धनुर्मास ‘ म्हणतात. त्यालाच  ‘ धुन्धुरमास ‘ असेही म्हणतात. यावर्षी १७ डिसेंबर २०२२ ते १४ जानेवारी २०२३ हा धुन्धुरमास आलेला आहे. धुन्धुरमास संपल्यावर  उत्तरायणाला प्रारंभ होतो. मकर संक्रांत  होत असते. हे दिवस थंडीचे असतात, भूक खूप लागते. म्हणून हे खास पदार्थ केले जातात. धुन्धुरमासात भगवान  विष्णूची उपासना केली जाते. विष्णू सहस्रनाम आणि वेंकटेश स्तोत्र पठण केले जाते. दक्षिण भारतात  या कालात ‘ गोदा रंगनाथ  कल्याणोत्सव ‘ साजरा केला जातो. प्राचीनकाळी   माणसाच्या  शरीराच्या व  मनाच्या  आरोग्याचे महत्त्व ओळखण्यात आले होते. शरीराचे आरोग्य आहारावर अवलंबून असते. ऋतूप्रमाणे आहार घेतला तर शरीराचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. म्हणून भारतीय संस्कृतींत सणांची रचना ऋतूप्रमाणे करण्यात आली आहे. ऋतू हे सूर्यावर अवलंबून असतात. सण हे चंद्रावर अवलंबून असतात. ठराविक सण ठराविक ऋतूत येण्यासाठी  पंचांगात चांद्र- सौर पद्धतीचा मेळ घातलेला आहे. म्हणून उपवासाचा श्रावण महिना पावसाळयात येतो. व तेल – तुपाचे पदार्थ असणारी दीपावली थंडीमध्ये येते. अधिकमास आणून हा मेळ घातला जातो. भारतीय संस्कृतीतही हेच तत्त्वज्ञान सांगितलेले आहे, पण आपण त्यापासून दूर गेलो आहोत. या धु्न्धुरमासाच्या निमित्ताने आपण परत ती जीवनशैली जगण्याचा प्रयत्न करूया. “  असे शेवटी दा. कृ. सोमण यांनी सांगितले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading