दोस्ती विहारमध्ये एकाच दिवशी ७३० रहिवाशांचे लसीकरण

खासगी रुग्णालयांच्या सहकार्याने शहरांतील गृहसंकुलांमध्ये लसीकरण सुरू झाले असून वर्तकनगर येथील दोस्ती विहार सोसायटीत पहिल्याच दिवशी ७३० रहिवाशांचे विक्रमी लसीकरण करण्यात आले आहे. सिद्धीविनायक रुग्णालयाच्या सहकार्याने दोस्ती विहार सोसायटीच्या क्लब हाऊसमध्ये या मोहिमेचे उद्घाटन महापौर नरेश म्हस्के यांच्या हस्ते झाले. केंद्र सरकारकडून मर्यादीत स्वरुपात लसींचा पुरवठा होत असल्याने पालिकेच्या लसीकरण केंद्रांवर नागरिकांच्या लांबलचक रांगा लागत आहेत. तासनतास रांगेत उभे राहिल्यानंतरही अनेकदा लस मिळत नसल्याने लोकांचे विशेषतः ज्येष्ठ नागरीकांचे हाल होत आहेत. ही कोंडी फुटावी यासाठी मान्यताप्राप्त रुग्णालयांना खासगी गृहसंकुलांमध्ये लसीकरण केंद्र सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे. शहरांत १०२ रुग्णालयांना ही परवानगी मिळाली असून टप्प्याटप्प्याने त्यांनी लसीकरणास सुरूवात केली आहे. केंद्र सरकारने देशात उत्पादन होणाऱ्या लसींपैकी २५ टक्के लसी विकत घेण्याची परवानगी खासगी रुग्णालयांना दिली आहे. त्यानुसार सिध्दिविनायक रुग्णालयाने खरेदी केलेल्या लसींचा साठा दोस्तीच्या रहिवाशांसाठी उपलब्ध करून देण्यात आला होता. पहिल्याच दिवशी ७३० जणांचे लसीकरण यशस्वी पद्धतीने पूर्ण करण्यात आले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading