दिव्यातील पाणी टंचाई विरोधात भारतीय जनता पक्षाचा महापालिकेवर मोर्चा

दिवा परिसरातील तीव्र पाणीटंचाईच्या विरोधात भारतीय जनता पक्षानं महापालिका मुख्यालयावर आज पाणी हक्क मोर्चा काढला. या मोर्चात दिवावासियांनी मडकी फोडून पाणीटंचाईविरोधातील सत्ताधारी आणि महापालिका प्रशासनाविरोधातील संताप व्यक्त केला. तसेच पाणीटंचाईवर तोडगा न काढल्यास महापालिका आयुक्तांच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. दिवा परिसरातील पाणी टंचाई विरोधात यापूर्वी दिव्यात अनेक वेळा आंदोलने करण्यात आली. मात्र पाणीटंचाई कायम राहिल्यामुळे नितीन कंपनी जंक्शनहून महापालिका मुख्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. पाणी आमच्या हक्काचे, पालकमंत्री हाय हाय, पाणीटंचाई न सोडविणाऱ्या सत्ताधाऱ्यांचा निषेध असो, अशा घोषणा नागरिकांकडून देण्यात आल्या. दिवा बोलणार, असे फलक झळकवित पाणी टंचाईच्या निषेधार्थ मडकी फोडून संताप व्यक्त केला. मोर्चातील शिष्टमंडळाने आयुक्तांची भेट घेऊन पाणीटंचाई दूर करण्याची मागणी केली. त्यावेळी टंचाईग्रस्त भागासाठी टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचे आश्वासन आयुक्तांनी दिले. दिव्यातील नळपाणी योजना आणि रस्त्यांसाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च करण्यात आला. मात्र, मुलभूत पाण्याची सुविधा सोडविण्यात अपयश आले आहे. जनतेचे प्रश्न सोडविण्याची राज्यातील सत्ताधाऱ्यांची भावनाच नसून, महापालिका प्रशासनाने पाणीटंचाईवर जनतेचा अंत पाहू नये. यापुढील काळात हा प्रश्न न सुटल्यास आयुक्तांच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन केले जाईल असा इशारा आमदार निरंजन डावखरे यांनी दिला. अनधिकृत बांधकामांना पाणी मिळत असताना रहिवासी पाण्यापासून वंचित आहेत, याबद्दल डावखरे यांनी टीका केली. आता मडकी फोडून आंदोलन केल्याने कधीतरी राज्यातील सत्ताधारी आणि प्रशासनाचे डोके ठिकाणावर येईल अशी अपेक्षा आहे. तहानलेल्या दिव्यासाठी आणखी लढा तीव्र केला जाईल, असा इशारा आमदार संजय केळकर यांनी दिला. दिव्यातील जनतेसाठी बांधलेले ई-टॉयलेट तोडले गेले. जनतेविषयी आस्था नसल्याची टीकाही संजय केळकर यांनी केली. यावेळी पालकमंत्र्यांच्या विरोधातही जोरदार घोषणा देण्यात आल्या.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading